YRF | यशराजचा 'तो' सिनेमा आपटला, तरीही सुशांतला 40 लाख जास्त का?

यशराज फिल्म्ससोबत सुशांतचा तीन चित्रपटांचा करार झाला होता (Sushant Singh Rajput case).

YRF | यशराजचा 'तो' सिनेमा आपटला, तरीही सुशांतला 40 लाख जास्त का?

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडच्या नामवंत ‘यशराज फिल्म्स’वरदेखील अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले (Sushant Singh Rajput case). याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी यशराज फिल्म्सच्या कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांचा जबाब नोंदवला. याशिवाय पोलिसांनी यशराज फिल्म्सकडे सुशांतसोबत केलेल्या करारांची कागपत्रे मागितली होती. कागदपत्रांची चौकशी आणि कास्टिंग डायरेक्टरच्या जबाबानंतर आणखी काही गोष्टी समोर आल्या आहेत (Sushant Singh Rajput case).

यशराज फिल्म्ससोबत सुशांतचा तीन चित्रपटांचा करार झाला होता. त्याला पहिल्या चित्रपटासाठी 30 लाखांचं मानधन देण्यात आलं होतं. पहिला चित्रपट हिट ठरला तर दुसऱ्या चित्रपटाला दुप्पट मानधन दिलं जाईल, असं करारात म्हटलं होतं. याशिवाय दुसराही चित्रपट हिट ठरला तर तिसऱ्या चित्रपटासाठी 1 कोटी रुपयाचं मानधन दिलं जाईल, असं करारात म्हटलं होतं.

हेही वाचा : सुशांत गुगलवर सतत आपली बातमी शोधायचा, कारण…..

सुशांतने यशराज फिल्म्ससोबत ‘शुद्ध देसी रोमान्स’ हा पहिला चित्रपट केला. त्याला या चित्रपटाचं 30 लाख रुपयांचं मानधन देण्यात आलं. त्यानंतर त्याने यशराज फिल्म्ससोबत ‘डिटेक्टिव ब्योमकेश बक्शी’ हा चित्रपट केला. या चित्रपटानिमित्त सुशांतला 60 लाखांऐवजी 1 कोटी रुपये एवढं मानधन देण्यात आलं. करारापेक्षा जास्त पैसे का दिले? याबाबत कोणतंही स्पष्टीकरण काराराच्या कागदपत्रात समोर आलेलं नाही.

दरम्यान, सुशांतसोबत यशराज फिल्म्सचा ‘पाणी’ हा तिसरा चित्रपट तयार करण्यात येणार होता. मात्र, या चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर कपूर आणि आदित्य चोप्रा यांच्यातील मतभेदांमुळे हा चित्रपट होऊ शकला नाही, अशी माहिती यशराज फिल्म्सच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिली.

सुशांतच्या टॅबचा फॉरेन्सिक तपास सुरु

सुशांतने आत्महत्या करण्यापूर्वी टॅबवर शेवटच्या क्षणी काय पाहिलं, काय शोधलं याचा तपासही आता पोलीस करत आहेत. त्यासाठी सुशांतचा टॅब आणि मोबाईल हे फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले आहेत. पोलीस फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टची वाट पाहत आहेत.

सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरी आत्महत्या

सुशांत सिंग राजपूत याने रविवारी (14 जून 2020) मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, सुशांतच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबाने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास वांद्रे पोलीस, सायबर सेल, फॉरेन्सिक विभाग आणि मुंबई क्राईम ब्रांचकडून होत आहे. (Sushant Singh Rajput Final Post Mortem Report)

हेही वाचा : सुशांतच्या आत्महत्येनंतर कुटुंबियांचा चाहत्यांसाठी मोठा निर्णय

सुशांत दर दोन वर्षांनी मॅनेजरची टीम बदलायचा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या करिअरच्या सुरुवातीपासून आतापर्यंत दर 2 वर्षांनी सुशांत आपल्या मॅनेजरची टीम बदलत होता. ही टीम त्याच्यासोबतच असायची. पोलीस सर्व मैनेजर्सचे जबाब घेत आहेत. त्यांनी दिलेले जबाबाची सत्यता तपासत आहेत. या प्रकरणात पुढे अजूनही तपास सुरु आहे.

रिया चक्रवर्तीची नऊ तास चौकशी 

सुशांतसिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिची गुरुवारी (18 जून) जवळपास नऊ तास चौकशी करण्यात आली होती. सकाळी 11 च्या सुमारास वांद्रे पोलिसात दाखल झालेल्या रियाचा जबाब रात्री जवळपास आठ वाजता संपला.

कास्टिंग डायरेक्ट मुकेश छाब्राचा जबाब

त्याआधी पोलिसांनी कास्टिंग डायरेक्ट मुकेश छाब्राचा जबाब नोंदवला गेला. मुकेश हा सुशांतचा पहिला मेंटॉर होता. सुशांत हा चित्रपटाच्या स्क्रिप्टबाबत नेहमी मुकेशसोबत चर्चा करायचा. सुशांतला फोनवर बोलायला आवडत नव्हतं. त्याला गेम खेळायला आवडायचं. सुशांत मित्रांचे फोनही घ्यायचा नाही. 27 मे रोजी मुकेशचा वाढदिवस होता. त्यावेळी सुशांतने त्याला फोन केला होता. सुशांतला अनेक चित्रपट मिळाले होते, अशी माहिती यावेळी समोर आली .

सुशांतच्या डायऱ्या जप्त

सुशांतच्या चार पाच डायऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचा अभ्यास करणं सुरु आहे. त्यात त्याने जनरल लिहलं आहे. वाचताना काही चांगला विचार असेल, तर तो ते नमूद करायचा. सुशांत हा 150 ड्रीमवर काम करत होता. आर्थिक आणि त्याच्या फिल्मशी संबंधित व्यवहार बघणाऱ्या काही लोकांना आम्ही चौकशीसाठी बोलवणार आहोत, असं पोलिसांनी सांगितलं होतं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *