लग्नानंतर स्वरा भास्कर हतबल; स्वत:विषयीच पडला प्रश्न, म्हणाली ‘हे सर्व खूप कठीण..’
अभिनेत्री स्वरा भास्कर पुन्हा एकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. लग्न आणि मुलीच्या जन्मानंतर स्वराने करिअरमधून ब्रेक घेतला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती तिच्या आयुष्यातील या नव्या टप्प्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

अभिनेत्री स्वरा भास्करने दमदार अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. मात्र चित्रपटांपेक्षा जास्त ती अनेकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. स्वराने समाजवादी युवजन सभेचा प्रदेशाध्यक्ष फहाद अहमदशी 2023 मध्ये लग्न केलं. या दोघांचं हे आंतरधर्मीय लग्न होतं. त्यानंतर त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात स्वराने मुलीला जन्म दिला. लग्न आणि मुलीच्या जन्मानंतर स्वरा चित्रपटांपासून दूर गेली. सध्या ती ‘पती, पत्नी और पंगा’ या शोमध्ये फहादसोबत झळकतेय. परंतु त्यानंतर चित्रपटांमध्ये काम करण्याचा इतक्यात विचार नसल्याचं तिने स्पष्ट केलं. घरातील जबाबदाऱ्या खांद्यावर असल्याने चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणं इतक्यात शक्य नसल्याचं स्वराने सांगितलं.
कमबॅकविषयी स्वरा म्हणाली, “मला माझं घर सोडून जायचं नाहीये. माझ्यासाठी हा एक शो करणंसुद्धा खूप कठीण होतं. बऱ्याच विचारविनिमयानंतर मी या शोसाठी होकार दिला होता. शूटिंगदरम्यानही मी इतर अनेक गोष्टी सांभाळत असते. खरं सांगायचं झालं तर स्वत:ला समजून घेणं, जाणून घेणं की मी नेमकी कोण आहे आणि मला कसं जगायचं आहे, हे माझ्यासाठी खूप कठीण होतं. परंतु माझी ओळख टिकवून ठेवण्यासाठी मला आता चित्रपटांच्या मागे धावायची काही गरज नाही. सध्या मी माझ्या आर्थिक स्थितीला मजबूत करण्यावर अधिक भर देतेय, जेणेकरून मी माझ्या मुलीला एका सुरक्षित घरात मोठं करू शकेन. मला काहीतरी काम नक्कीच करायचं आहे.”
View this post on Instagram
“चित्रपटसृष्टीत पुन्हा सक्रिय होण्याची मला सध्या तरी घाई नाही. किंबहुना मला कुठेच वापसी करायची नाहीये. माझं एक बाळ आहे आणि ते माझ्या आयुष्यात कायम राहणार आहे. मी एक आई आहे आणि आयुष्यभर आईची जबाबदारी पार पाडणार आहे”, असं स्वराने स्पष्ट केलं. स्वराने शेवटचं ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात काम केलं होतं.
स्वरा भास्कर चित्रपटांपेक्षा तिच्या बेधडक वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहते. स्वराने राजकारणी फहाद अहमदशी कोर्टात स्पेशल मॅरेज ॲक्टअंतर्गत लग्न केलं. या दोघांचे धर्म वेगवेगळे आहेत. फहाद मुस्लीम तर स्वरा हिंदू आहे. एका रॅलीदरम्यान दोघांची पहिली भेट झाली होती.
