बायसेक्शुअल, गे, लेस्बियन यात काय फरक? स्वरा भास्करच्या वक्तव्यानंतर होतेय चर्चा
बायसेक्शुअल, गे आणि लेस्बियन यांसारखे शब्द आजकाल मोकळेपणे चर्चेत वापरले जात आहेत. परंतु अनेकांना या तिघांमधील फरक माहीत नसतो. अभिनेत्री स्वरा भास्करच्या एका वक्तव्यानंतर या संकल्पना पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते. विविध मुद्द्यांवर ती तिची मतं मोकळेपणे मांडताना दिसते. आता पुन्हा एकदा स्वरा तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांची पत्नी आणि खासदार डिंपल यादव यांच्याविषयी वक्तव्य केलं. डिंपल यादव यांना तिने स्वत:चं क्रश असल्याचं म्हटलं होतं. इतकंच नव्हे तर ‘आपण सर्वजण बायसेक्शुअल आहोत’ असाही दावा तिने केला होता.
“जर माणसाला आपल्या मर्जीने जगण्याची संधी दिली तर आपण सर्वजण बायसेक्शुअल असतो. हेटेरोसेक्शुअलिटी म्हणजेच मुलगा आणि मुलीचं नातं हा फक्त सामाजिक विचार आहे, ज्याला हजारो वर्षांपासून माणसांवर थोपवण्यात आला आहे”, असं मत स्वराने मांडलं होतं. तिच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. बायसेक्शुअल, गे आणि लेस्बियन या संकल्पनांवरून अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
बायसेक्शुअल म्हणजे काय?
बायसेक्शुअल, गे आणि लेस्बियन यांसारखे शब्द आजकाल समाजात मोकळेपणे वापरले जात आहेत. परंतु अनेकांना त्यांचा अर्थ माहीत नाही. बायसेक्शुअल ही अशी व्यक्ती असते, जी एकापेक्षा जास्त लिंगांच्या व्यक्तीकडे आकर्षित होते. म्हणजेच हे लोक पुरुष आणि महिला अशा दोघांकडेही लैंगिकदृष्ट्या आकर्षित होतात. स्वत:ला बायसेक्शुअल म्हणवून घेण्यासाठी त्यांना लैंगिक अनुभव असणं आवश्यक नसतं.
गे आणि लेस्बियनचा अर्थ
‘गे’ हा शब्द सर्वसामान्यपणे पुरुषांसाठी वापरला जातो, जे भावनात्मक किंवा लैंगिकदृष्ट्या दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित होतात. यालाच समलैंगिकता (होमोसेक्शुअलिटी) असंही म्हटलं जातं. तर दुसरीकडे, लेस्बियन हा शब्द महिलांसाठी वापरला जातो, ज्या दुसऱ्या महिलांकडे भावनात्मक, रोमँटिक किंवा लैंगिक दृष्टीने आकर्षित होतात. समलैंगिक महिलांसाठी हा शब्द वापरला जातो. गे आणि लेस्बियन हे दोन्ही शब्द समलैंगिकतेच्या श्रेणीत येतात.
गे आणि लेस्बियन हे बायसेक्शुअलपासून वेगळे कसे?
या तिन्ही श्रेणींमधील मुख्य फरक हा आकर्षणाच्या व्याप्तीमध्ये आहे. समलिंगी पुरुष (गे) हे फक्त पुरुषांकडे आकर्षिक होतात आणि समलिंग महिला (लेस्बियन) या फक्त महिलांकडे आकर्षित होतात. परंतु बायसेक्शुअल लोकांना दोन्ही लिंगांबद्दल आकर्षण वाटू शकतं.
