जेठालालपेक्षा महागडा मीच, एका सीनसाठी..; ‘तारक मेहता..’मधील सुंदरचा खुलासा
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत सुंदरलालची भूमिका साकारणारा अभिनेता मयूर वकानी याने स्वत:ला मालिकेतील सर्वांत महागडा कलाकार असल्याचं म्हटलंय. तो असं का म्हणाला, त्याबद्दल जाणून घ्या..

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेला 28 जुलै 2026 रोजी तब्बल 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. 2008 मध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आतापर्यंत 4700 एपिसोड्स पूर्ण केलेल्या या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. जेठालाल, दयाबेन, सुंदरलाल, बापूजी, टप्पू, आत्माराम भिडे, माधवी भाभी, सोढी, नट्टू काका, बाबा.. या भूमिका घराघरात लोकप्रिय आहेत. मालिकेला 18 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त निर्माते असित कुमार मोदी यांनी सेटवर खास पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी मालिकेतल्या कलाकारांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि काही मजेशीर किस्सेसुद्धा सांगितले.
मालिकेत जेठालालचा मेहुणा सुंदरलालची भूमिका साकारणारा अभिनेता मयूर वकानी या पत्रकार परिषदेदरम्यान निर्मात्यांसोबतच्या नात्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल त्याने त्यांचे मनापासून आभारदेखील मानले. मयूर वकानी हा मालिकेत दयाबेनची भूमिका साकारलेली अभिनेत्री दिशा वकानीचा खऱ्या आयुष्यातील भाऊ आहे. मंचावर बोलताना त्याने बहीण दिशाचीही आठवण काढली आणि मालिकेतील तिच्या योगदानाचं कौतुक केलं. बहिणीविषयी बोलताना यावेळी मयूर भावूक झाला होता.
पहा व्हिडीओ
View this post on Instagram
पुढे मयूरने मालिकेतील त्याच्या भूमिकेबद्दल बोलताना हलकीफुलकी मस्करीसुद्धा केली. “जितना चुना मै जेठालाल को लगाया है, उससे कही ज्यादा असितजी को लगाया है (या मालिकेत मी जेठालालला जितकं फसवलं आहे, त्यापेक्षा जास्त मी असित मोदी यांना फसवलं आहे. कारण प्रॉडक्शनच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर या मालिकेचा सर्वांत महागडा कलाकार मीच आहे. कारण एका शॉटसाठी ते अजूनपण मला विमानाने बोलवतात आणि विमानाने पाठवतात),” असं तो म्हणताच मंचावरील असित मोदी आणि दिलीप जोशीसह इतरही कलाकार हसू लागतात.
मयूर वकानी हा अभिनेत्री दिशा वकानीचा सख्खा भाऊ आहे. 2017 मध्ये दिशाने प्रेग्नंसीमुळे या मालिकेतून ब्रेक घेतला होता. परंतु त्यानंतर ती मालिकेत परतलीच नाही. दयाबेन कधी परत येणार, असा प्रश्न वारंवार निर्मात्यांना आणि इतर कलाकारांना विचारला जातो, मात्र त्यावर अद्याप निश्चित उत्तर कोणालाच देता आलं नाही. “आता काहीतरी चमत्कार होऊन दिशा या मालिकेत परत येऊ दे”, अशी प्रतिक्रिया दिलीप जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली होती.
