अभिनेत्रीच्या ब्रेकअपने घाबरले पालक; बॉयफ्रेंडसोबत लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी आईवडिलांचा आग्रह
अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा आहेत. मात्र लग्नापूर्वी हे दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. यासाठी आईवडीलच आग्रही होती, असा खुलासा तेजस्वीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.

‘बिग बॉस’ फेम जोडी तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हे दोघं त्यांच्या नात्याबद्दल नेहमीच माध्यमांसमोर मोकळेपणे व्यक्त झाले. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तेजस्वीने करणसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला. विशेष म्हणजे आई-वडिलांनीच त्यासाठी परवागनी दिल्याचं तेजस्वीने म्हटलंय. लिव्ह-इन रिलेशनशिपसाठी अनेक जोडप्यांना सहसा आईवडिलांकडून परवानगी मिळत नाही किंवा त्याचा विरोध केला जातो. परंतु तेजस्वी आणि करणच्या बाबतीत आई-वडिलांनीच पुढाकार घेतल्याचं समजतंय. यामागचं कारणसुद्धा तेजस्वीने या मुलाखतीत सांगितलं आहे.
‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत तेजस्वी म्हणाली, “माझ्या शेवटच्या ब्रेकअपनंतर आईवडिलांचा लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दलचा निर्णय आणखी पक्का झाला (हसते). इतरांचं आम्हाला माहीत नाही, पण तुम्ही दोघं एकत्र राहा. कारण तू खूप चंचल मनाची आहेस, असं ते म्हणाले. करण आणि मी लिव्ह-इनमध्ये राहावं असा माझ्या आईवडिलांचा आग्रह होता. त्याला त्याच्याही आईवडिलांची परवानगी होती. खरंतर ही पूर्णपणे लिव्ह-इनसारखी परिस्थिती नाही. कारण मी दुसऱ्या राज्यात राहत नाही. मी भाड्याच्या घरात राहते. मी मुंबईकर आहे आणि मुंबईत माझं घर आहे. त्यामुळे जेव्हा माझ्या घराजवळ शूटिंग असतं तेव्हा मी माझ्या घरी राहते. जेव्हा मला आराम करायचं असतं, तेव्हा मी त्याच्या घरी राहते. त्याचं घर वांद्र्याला आणि माझं गोरेगावला आहे. माझं काम फिल्मसिटीमध्ये असतं तेव्हा मी माझ्याच घरी राहते. पण जर तेच शूटिंग वांद्र्याजवळ असेल तर मी त्याच्याकडे राहायला जाते.”
View this post on Instagram
“याला पूर्णपणे लिव्ह-इन रिलेशनशिप म्हणता येणार नाही. पण यातली सर्वोत्कृष्ट बाब म्हणजे आम्ही दोघं एकमेकांच्या घरी एकमेकांच्या आईवडिलांसोबत राहतो. करण माझ्या घरी माझ्या आईवडिलांसोबत राहतो आणि मी त्याच्या घरी त्याच्या आईवडिलांसोबत राहते. आम्ही एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे ओळखण्याचा प्रयत्न करतोय, हे आमचे पालक समजून घेतायत, हीच खूप मोठी गोष्ट आहे. मला वैयक्तिक विचाराल तर मी म्हणेन की लग्नाआधी त्या व्यक्तीसोबत राहणं खूप गरजेचं असतं. कारण फक्त डेटवर आणि ड्राइव्हिंगला जाऊन त्या व्यक्तीबद्दल जी स्पष्टता येत नाही की सोबत राहिल्याने येते”, असं तेजस्वीने सांगितलं. तेजस्वी आणि करण कुंद्रा हे ‘बिग बॉस 15’मध्ये एकमेकांना भेटले. बिग बॉसच्या घरातच हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.
