घोड्याच्या सीनवरून विकी कौशलच्या ‘छावा’ची पोलखोल झाल्याचं म्हणणाऱ्यांनी हे एकदा वाचाच!
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून विकीला ट्रोल करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र त्यामागचं सत्य काहीतरी वेगळंच आहे.

विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘छावा’ या चित्रपटाने सर्वत्र चर्चा घडवून आणली आहे. प्रदर्शनाच्या 25 दिवसांत या चित्रपटाने कमाईचा 700 कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटात विकीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्याने बरीच मेहनत घेतली आहे. शूटिंगदरम्यानचे पडद्यामागचे बरेच सीन्ससुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमुळे काही नेटकरी विकीला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्या व्हिडीओमागील सत्य वेगळंच आहे. हा व्हिडीओ कोणता आहे आणि त्यामागचं सत्य काय, ते जाणून घेऊयात..
विकीने एका मुलाखतीत शूटिंगदरम्यानचा एक किस्सा सांगितला होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी त्याने घोडदौडीचं विशेष प्रशिक्षण घेतलं होतं. सहा महिने तो आझाद नावाच्या घोड्यासोबत सराव करत होता. याविषयी तो म्हणाला, “मला अजूनही आठवतंय की मुख्य घोडदौडीच्या सीनच्या शूटिंगपूर्वी मी माझ्या घोड्यासोबत संवाद साधत होतो. त्याला मी म्हणालो, आझाद भाई ऐक.. गेल्या सहा महिन्यांपासून आपण तयारी करतोय. आता खरी वेळ आली आहे. भावा, माझी इज्जत सांभाळ. फक्त तू धाव, मी तुझ्यासोबत आहे, मी पडणार नाही. कारण मी पडलो, तर माझ्यावरून मागून येणारे 100 घोडे जातील. मागचे 100 घोडे कुठे ब्रेक लावणार, ते तर धावतच जाणार.”
View this post on Instagram
या मुलाखतीनंतर आता ‘छावा’च्या सेटवरील हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. यामध्ये विकी एका डमी म्हणजेच खोट्या घोड्यासोबत शूटिंग करताना दिसून येत आहे. हा घोडा हुबेहूब खऱ्या घोड्यासारखाच असला तरी तो खरा घोडा नाही. त्यामुळे विकीने खऱ्या घोड्यासोबत शूटिंग केल्याचं खोटं सांगितल्याचा आरोप नेटकऱ्यांकडून होत आहे. मात्र या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य वेगळंच आहे.
ज्या व्हिडीओमध्ये विकी डमी घोड्यावर बसून सीन शूट करताना दिसून येत आहे, त्यावेळी दिग्दर्शकांना त्यांचा क्लोजअप म्हणजेच अगदी जवळून शॉट घ्यायचा होता. सर्वसामान्यपणे चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जेव्हा अशा पद्धतीचे क्लोजअप शॉट्स घ्यायचे असतात, तेव्हा अशा पद्धतीच्या प्रॉपचा वापर केला जातो. ‘छावा’च्या प्रदर्शनापूर्वी निर्मात्यांनी विकीच्या ट्रेनिंगचाही व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये तो घोडेस्वारी शिकताना दिसून आला होता. आणखी एका व्हिडीओमध्ये संपूर्ण सीन कशा पद्धतीने शूट करण्यात आला, तेसुद्धा दाखवण्यात आलं आहे. यामध्ये विकी आझाद नावाच्या घोड्यावरून घोडदौड करताना आणि त्याच्या मागे इतर घोडे धावताना दिसून येत आहे. या व्हिडीओमधून विकीची मेहतन दिसून येत आहे. या भूमिकेच्या तयारीत त्याने कोणतीही कसर सोडली नाही, हे स्पष्ट जाणवत आहे.
