कोण शाहरुख खान? विवेक ओबेरॉयचं चकीत करणारं वक्तव्य, 2050 पर्यंत..
अभिनेता विवेक ओबेरॉय नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शाहरुख खानबद्दल असं काही म्हणाला, ज्याने सर्वांनाच चकीत केलंय. 2050 पर्यंत लोक कदाचित हेसुद्धा विसरतील की शाहरुख खान कोण आहे, असं तो म्हणाला आहे.

अभिनेता विवेक ओबेरॉय सध्या त्याच्या आगामी ‘मस्ती 4’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट येत्या 21 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विवेकसोबत रितेश देशमुख, आफताब शिवदासानी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत विवेकने बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानविषयी वक्तव्य केलं आहे, ज्याची सध्या चर्चा होत आहे. पुढच्या 25 वर्षांत लोक शाहरुखला विसरून जातील, असं तो म्हणाला. ‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत विवेक म्हणाला, “1960 मध्ये कोणता चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि त्यात कोणी काम केलं होतं, हे आज कोणालाच माहीत नाही. कोणाला काहीच फरक पडत नाही. तुम्हाला इतिहासात ढकललं जातं. 2050 मध्ये कदाचित लोक बोलतील की कोण शाहरुख खान?”
याविषयी तो पुढे म्हणाला, “जसं आज लोक विचारत असतील की कोण राज कपूर? तुम्ही आणि मी त्यांना चित्रपटासृष्टीचा देव म्हणतो, परंतु तुम्ही जेव्हा एखाद्या तरुणाला विचारत असाल, जो रणबीर कपूरचा चाहता आहे, कदाचित त्याला राज कपूर माहीतच नसतील. म्हणजेच इतिहास तुम्हाला शून्यात ढकलतो.” विवेक ओबेरॉयने मांडलेलं हे मत सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोक इतिहासातही जिवंत राहतात, असं एकाने म्हटलंय. तर लोक विवेक ओबेरॉयला विसरतील पण शाहरुखला नाही.. असा टोला दुसऱ्याने लगावला आहे.
शाहरुख खान हा सध्या देशातील सर्वांत श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. गेल्या दोन वर्षांत प्रदर्शित झालेले त्याचे ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. या तिन्ही चित्रपटांनी जगभरात तब्बल 2600 कोटी रुपयांची कमाई केली होती. आता तो लवकरच ‘किंग’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून यामध्ये त्याची मुलगी सुहाना खान, दीपिका पादुकोण, राणी मुखर्जी, राघव जुयाल, अर्शद वारसी आणि अभिषेक बच्चन अशी मोठी स्टारकास्ट आहे.
