कोण आहेत राहुल देशपांडे? लग्नाच्या 17 वर्षांनंतर पत्नीपासून झाले विभक्त
प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी घटस्फोट जाहीर केला. लग्नाच्या 17 वर्षांनंतर ते पत्नी नेहापासून विभक्त झाले. सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांनी याबद्दलची माहिती दिली. परस्पर संमतीने घटस्फोट घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी लग्नाच्या 17 वर्षांनंतर पत्नी नेहापासून विभक्त होत असल्याचं जाहीर केलं. दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली. घटस्फोटाचं वृत्त सार्वजनिक करण्याआधी राहुल आणि नेहा यांनी त्यांच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना याबद्दल सांगितलं होतं. त्यानंतर दोघांनी सोशल मीडियाद्वारे घटस्फोट जाहीर केला. परस्पर संमतीने विभक्त होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. अद्याप त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील कोणताच विवाद चर्चेत आला नव्हता.
राहुल देशपांडे यांची पोस्ट-
‘माझं आणि नेहाचं 17 वर्षांचं वैवाहिक नातं आता संपुष्टात आलं आहे. आम्ही दोघांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर 2024 मध्ये आम्ही कायदेशीररित्या घटस्फोट घेतला आहे. हा निर्णय आम्ही दोघांनी खूप विचार करून, समजून आणि सोहार्दपूर्ण पद्धतीने घेतला आहे. हा बदल समजून घेण्यासाठी आणि योग्य पद्धतीने सांगण्यासाठी आम्ही थोडा वेळ घेतला’, असं राहुल यांनी पोस्टमध्ये लिहिलंय. त्याचप्रमाणे मुलगी रेणुका ही सर्वोच्च प्राधान्य असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. नेहासोबत मिळून तिचं संगोपन करणार असल्याचं राहुल यांनी म्हटलंय.
View this post on Instagram
कोण आहेत राहुल देशपांडे?
राहुल देशपांडे हे प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक आणि अभिनेते आहेत. ‘मी वसंतराव’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक मोठे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचा 10 ऑक्टोबर 1979 रोजी पुण्यात जन्म झाला. महान गायक पंडित वसंतराव देशपांडे यांचे ते नातू आहेत. राहुल शास्त्रीय संगीत, ठुमरी, गजल आणि भजनसाठी ओळखले जातात. ते ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ आणि ‘संगीत सम्राट 2’ यांसारख्या टीव्ही शोजमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत होते.
राहुल यांनी त्यांच्या आजोबांच्या ‘कट्यार काळजात घुसली’ या प्रसिद्ध नाटकाला पुन्हा रंगभूमीवर आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांनी ‘खान साहब आफताब हुसैन बरेलीवाले’मध्ये सचिन पिळगांवकर यांच्यासाठी एक गाणंसुद्धा गायलं होतं. 2011-12 मध्ये राहुल यांनी काकासाहेब खादिलकर यांच्या ‘संगीत मनाना’ या नाटकाला नव्या अंदाजात सादर केलं. हे नाटक पाच भागात होतं आणि त्यात 52 गाणी होती. राहुल यांनी त्याला छोटं करून दोन भाग आणि 22 गाण्यांसह सादर केलं.
