Ramayana: ‘अॅनिमल’मधील खतरनाक विलेन बनला ‘रामायण’चा गेमचेंजर; छोट्याशा भूमिकेची सर्वत्र चर्चा
Ramayana: रणबीर कपूरच्या 'रामायण' या चित्रपटात एका अभिनेत्याने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. या अभिनेत्याने चित्रपटात मारिचची भूमिका साकारली आहे. याआधी त्याने 'अॅनिमल'मध्ये रणबीरसोबत काम केलं होतं.

Ramayana: बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर याच्या ‘रामायण’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या बिग बजेट चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसत आहे, तर साऊथ सुपरस्टार यश रावणाची भूमिका साकारत आहे. चित्रपटातील कलाकारांचे लूक आणि भूमिकांबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मुख्य कलाकारांसोबतच सहाय्यक भूमिकांनीही प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं. असाच एक अभिनेता सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा अभिनेता म्हणजे सौरभ सचदेव. ‘अॅनिमल’ चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारून चर्चेत आलेला सौरभ आता ‘रामायण’मध्ये मारीचच्या भूमिकेत दिसत आहे.
‘रामायण’मध्ये महत्त्वाची भूमिका
‘रामायण’च्या ट्रेलरमध्येही सौरभ सचदेवची झलक पाहायला मिळाली होती. त्याची भूमिका फार वेळ पडद्यावर दिसत नसली तरी कथानकाच्या दृष्टीने ती अत्यंत महत्त्वाची आहे. सौरभ या चित्रपटात मारीचची भूमिका साकारत आहे. रावणाच्या सांगण्यावरून मारीच सोन्याच्या हरणाचं रूप धारण करतो. हे सुंदर हरीण पाहून माता सीता त्याला आणण्याचा आग्रह धरतात. त्यामुळे प्रभू श्रीराम त्या हरणाच्या मागे जातात. यानंतर मारीच प्रभू श्रीराम यांच्या आवाजात लक्ष्मणाला हाक मारतो. त्यामुळे सीतेच्या रक्षणासाठी लक्ष्मणही कुटीतून बाहेर पडतात. याच संधीचा फायदा घेत रावण सीतेचं अपहरण करतो. त्यामुळे रामायणातील संपूर्ण कथानकाला कलाटणी देणाऱ्या घटनांमध्ये मारीचची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.
पहा फोटो-
View this post on Instagram
‘अॅनिमल’मधील खलनायकामुळे मिळाली ओळख
सौरभ सचदेवने 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अॅनिमल’ चित्रपटात आबिद हक ही भूमिका साकारली होती. या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत होता. सौरभची भूमिका तुलनेने छोटी असली तरी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्याचा खलनायकी अंदाज आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. आता पुन्हा एकदा सौरभ आणि रणबीर एकाच चित्रपटात दिसत आहेत. मात्र, यावेळी दोघांची कथानकातील स्थानं पूर्णपणे वेगळी आहेत. ‘अॅनिमल’मध्ये खलनायक म्हणून लक्ष वेधणारा सौरभ ‘रामायण’मध्ये पौराणिक व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांसमोर आला आहे.
केवळ अभिनेता नाही, तर प्रसिद्ध अभिनय प्रशिक्षकही
सौरभ सचदेवबद्दलची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे तो केवळ अभिनेता नाही, तर उत्तम अभिनय प्रशिक्षकही आहेत. ‘द अॅक्टर्स ट्रुथ’ या नावाने तो अभिनय प्रशिक्षण संस्था चालवतो. वरुण धवन, अर्जुन कपूर, दुल्कर सलमान आणि ऋचा चड्ढा यांसारख्या कलाकारांना त्याने अभिनयाचं प्रशिक्षण दिलं आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्रात त्याचा अनुभव मोठा आहे.
कोण होता मारीच?
रामायणातील कथेनुसार, मारीच हा ताडकेचा पुत्र आणि रावणाचा मामा होता. त्याच्याकडे मायावी शक्ती होत्या. रूप बदलण्याच्या कलेत तो पारंगत होता. रावणाच्या सांगण्यावरून त्याने सुवर्णमृगाचं रूप धारण केलं आणि सीताहरणाच्या कटात महत्त्वाची भूमिका बजावली. अखेर प्रभू श्रीरामांच्या बाणाने त्याचा अंत झाला.
दरम्यान, नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’मध्ये रणबीर कपूर, साई पल्लवी, यश, सनी देओल, रवी दुबे आणि रकुल प्रीत सिंह यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करतोय.
