Ramayana: कोण होते विद्युतजिह्वा? ‘रामायण’मध्ये विवेक ओबेरॉय साकारतोय भूमिका
Ramayana : 'रामायण' या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय विद्युतजिह्वा यांची भूमिका साकारत आहेत. ते कोण होते, रामायण या महाकाव्यात त्यांच्याबद्दल काय लिहिलं आहे, याविषयी जाणून घ्या..

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या बिग बजेट चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलरमधील चित्रपटातील बऱ्याच भूमिकांची झलक पहायला मिळाली. यात अभिनेता विवेक ओबेरॉयनेही सर्वांचं लक्ष वेधलं आहे. परंतु विवेक नेमकी कोणाची भूमिका साकारणार आहे, याबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘रामायण’ या चित्रपटात तो विद्युतजिह्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. पौराणिक कथा आणि ‘रामायण’ या महाकाव्यानुसार विद्युतजिह्वा हे रावणाची बहीण शूर्पणखाचे पती होते.
पौराणिक कथेनुसार, विद्युतजिह्वा हे कालकेय राक्षस कुळातील एक पराक्रमी योद्धा होते. तर इतर काही कथांनुसार, ते कालकेय नावाच्या राजाच्या सैन्याचा प्रमुख होते. ते राक्षस कुळातील होते आणि रावणाचे शत्रू होते. कालकेय वंशाचा सतत देवदेवतांसोबत तर कधीकधी इतर राक्षस राजांसोबतही संघर्ष होत असे. शूर्पणखेनं विद्युतजिह्वाशी गंधर्व प्रेमविवाह केला होता. परंतु तिचा भाऊ रावणाला हा विवाह स्वीकार नव्हता. ‘रामायणा’च्या वेगवेगळ्या आवृत्त्यांमध्ये या नात्याबद्दल वेगळे संदर्भ आढळतात. काही आख्यायिकांनुसार, रावण शूर्पणखेच्या विवाहाने खूश नव्हता. कारण विद्युतजिह्वाने पृथ्वी आणि स्वर्ग या दोन्हींवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. कौटुंबिक प्रतिष्ठा, आपापसातील वैर आणि वेगवेगळ्या पक्षांमुळे रावणाने त्या दोघांच्या नात्याला विरोध केला होता.
काही कथांनुसार रावण विद्युतजिह्वाचा द्वेष करत असे. एकदा विश्वप्रदक्षिणेच्या मोहिमेवर असताना रावणाने सर्वप्रथम दक्षिणेकडील अनेक राज्ये जिंकली. त्यानंतर त्याने पृथ्वी आणि स्वर्गावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. त्यानंतर तो पाताळात पोहोचला. तिथे त्याची भेट विद्युतजिह्वाशी झाली. विद्युतजिह्वाने रावणाला पाठिंबा देण्यास नकार दिला आणि युद्ध करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांच्यात भीषण युद्ध झालं आणि त्यात विद्युतजिह्वा मारला गेला. जेव्हा शूर्पणखेला तिच्या पतीच्या मृत्यूची बातमी कळली, तेव्हा तिला अतीव दु:ख झालं. ती भाऊ रावणावर प्रचंड संतापली. क्रोधाच्या भरात तिने रावणाला शाप दिला की, ज्या गर्वाने तिचं संसार उद्ध्वस्त केलं, तोच गर्व त्याच्या मृत्यूचं कारण ठरेल.
‘रामायण’ हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून या दोन्ही भागांचं बजेट तब्बल 4000 कोटी रुपयांचं असल्याचं कळतंय. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर हा प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत असून साई पल्लवीने सीतेची भूमिका साकारली आहे.
