एजे-लीलाची जोडी हिट पण सीरिअल फ्लॉप; ‘नवरी मिळे हिटलरला’कडून चाहत्यांना धक्का
झी मराठी वाहिनीवरील 'नवरी मिळे हिटलरला' ही अत्यंत लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं कळतंय. या मालिकेतील कलाकारांनी नुकतीच एक रील सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

झी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं कळतंय. या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं, त्यातील भूमिकासुद्धा घराघरात गाजल्या आहेत, तरीसुद्धा आता ही मालिका बंद होणार असल्याचं समजतंय. ही मालिका दुसरी-तिसरी कोणती नसून ‘नवरी मिळे हिटलरला’ आहे. यामधील एजे-लीलाची जोडी जरी प्रेक्षकांमध्ये हिट झाली तरी टीआरपीच्या शर्यतीत आपला वेग कायम राखणं या मालिकेला जमलं नाही, असं दिसतंय. अभिनेत्री वल्लरी विराजने यात लीलाची तर राकेश बापटने यात एजेची भूमिका साकारली आहे. झी मराठीवर ही मालिका सुरू होताच अल्पावधीतच ती प्रेक्षकांना आवडू लागली होती. त्यामुळे आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार म्हटल्यावर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
एकीकडे ही मालिका निरोप घेणार असल्याची चर्चा असतानाच वल्लरीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक रील पोस्ट केली आहे. यामध्ये मालिकेतील अभिनेत्री डान्स करताना दिसत आहेत. या रीलचं कॅप्शन वाचून चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘जहागीरदार गर्ल्स, एकदा शेवटचं. हे खूप स्पेशल आहे’, असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय. या रीलमध्ये ‘मैं कोई ऐसा गीत गाऊं’ या गाण्यावर सरोजिनी आजी, लीला, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, रेवती आणि अंतरा डान्स करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
वल्लरीच्या या रीलवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘बेस्ट टीम, बेस्ट शो.. आम्ही तुमच्या सर्व भावी प्रोजेक्ट्सना पाठिंबा देऊ’, असं एकाने लिहिलंय. तर ‘या मालिकेची खूप आठवण येईल’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘शेवटचं असं म्हणू नका. ही मालिका बंद करू नका’, अशी विनंती नेटकऱ्यांनी केली आहे. ‘शेवटचं असं का म्हणताय? गुडबाय म्हणायची वेळ अजून आली नाही’, असंही काहींनी म्हटलं आहे.
‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका झी मराठी वाहिनीवर 18 मार्च 2024 पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आतापर्यंत या मालिकेचे 370 हून अधिक एपिसोड्स पार पडले आहेत. सुरुवातीला ही मालिका टीआरपीच्या शर्यतीतही अग्रेसर असायची. ही मालिका ‘गुड्डन तुमसे ना हो पाएगा’ या हिंदी मालिकेचा मराठी रिमेक आहे.
