Zubeen Garg : गायक झुबीन गर्गच्या मृत्यूप्रकरणी दोघांना अटक; तपासात सिंगापूरचे अधिकारीही करणार मदत
Zubeen Garg death case : केंद्र सरकारने मृत्यू प्रकरणातील चौकशीला मदत करण्यासाठी सिंगापूरसोबत परस्पर कायदेशीर सहाय्य करार (MLAT) लागू केला आहे. "संबंधित अधिकाऱ्यांकडून मदत घेण्यासाठी आसामचे दोन पोलिस अधिकारी आधीच सिंगापूरमध्ये आहेत," असं मुख्यमंत्री सरमा यांनी मंगळवारी स्पष्ट केलं.

Zubeen Garg death case : प्रसिद्ध गायक झुबीन गर्गच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी बुधवारी ‘नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हल’चे आयोजक श्यामकानू महंता आणि झुबीनचा मॅनेजर सिद्धार्थ शर्मा यांना अटक केली. 19 सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये स्कुबा डाइव्हिंगदरम्यान झुबीनचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या मृत्यूबाबत विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत. सिंगापूरमध्ये आयोजित केलेल्या ‘नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हल’मध्ये परफॉर्म करण्यासाठी तो तिथे गेला होता. आयोजक श्यामकानू महंता यांना सिंगापूरमधूनच ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना आधी दिल्लीत आणलं गेलं आणि नंतर कडक सुरक्षेत गुवाहाटीला नेण्यात आलं. तर झुबीनचा सहाय्यक आणि मॅनेजर सिद्धार्थ शर्माला गुरुग्राममधील फ्लॅटमधून अटक करण्यात आली. त्यालाही गुवाहाटीला नेण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दोघांना अटक
गेल्या आठवड्यात इंटरपोलमार्फत दोघांविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. श्यामकानू आणि सिद्धार्थ यांनी 6 ऑक्टोबर रोजी गुवाहाटी इथं चौकशी पथकासमोर त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी हजर राहावं, असं आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितलं होतं. दरम्यान झुबीनच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी आसाम सरकारने विशेष डीजीपी एमपी गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली 10 सदस्यीय विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. या तपासादरम्यान एसआयटीने सिद्धार्थच्या गुवाहाटी इथल्या घरावर छापा टाकला होता. त्यात त्यांनी अनेक कागदपत्रे जप्त केली होती.
चाहत्यांमध्ये शोककळा
‘या अली’, ‘जाने क्या चाहे मन’ यांसारख्या ब्लॉकबस्टर गाण्यांचा गायक झुबीन गर्गचा आसाम आणि देशभरात मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्याच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला. 23 सप्टेंबर रोजी आसामच्या कामरूप जिल्ह्यात त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी लाखो चाहते त्याला अखेरचा निरोप देण्यासाठी तिथे जमले होते.
सिंगापूरमध्ये स्कुबा डाइव्हिंगदरम्यान झुबीनचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. परंतु नंतर त्याची पत्नी गरीमा सैकियाने सांगितलं की त्याला पोहताना झटका झाला होता. पाण्यात पोहताना झुबीनने लाइफ जॅकेट घातलं नव्हतं, अशीही माहिती समोर येत होती. तर सिंगापूरच्या अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन अहवालात झुबीनचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचं नोंदवलंय. त्यानंतरही अनेक शंका उपस्थित होत असताना आसाममध्ये झुबीनच्या पार्थिवावर दुसऱ्यांना शवविच्छेदन करण्यात आलं.
