गणेश चतुर्थीनिमित्त आपल्या लाडक्या बाप्पासाठी बनवा ‘हे’ 5 फ्लेवर्सचे मोदक, जाणून घ्या झटपट सोपी रेसिपी
येत्या काही दिवसातच आपल्या लाडक्या बाप्पाचे अनेकांच्या घरी आगमन होणार आहे. तर गणेश चतुर्थी निमित्त तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या आणि झटपट तयार होणारे हे पाच प्रकारचे मोदक बनवा. चला तर आजच्या लेखात आपण मोदकांची रेसिपी जाणून घेऊयात...

14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती म्हणजेच आपल्या लाडक्या गणरायांच 27 ऑगस्ट 2025 रोजी आगमन होणार आहे. तर या गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी घरोघरी मोदक बनवले जातात. तसेच काहीजण हे बाजारातून मोदक विकत आणतात. सणासुदीच्या दिवसांमध्ये बाजारामध्ये अनेकदा भेसळयुक्त पदार्थ सरास विकले जातात आणि अशा घटना आपण अनेकदा ऐकले असतील. अशावेळी तुम्ही तुमच्या लाडक्या बाप्पाला घरच्या घरी वेगवेगळ्या फ्लेवर्सचे मोदक बनवू शकतात. मोदक हा बाप्पांचा आवडता नैवेद्य आहे, जो खायला खूप चविष्ट असतो. तर या मोदकांची सर्वात खास गोष्ट म्हणजे तुम्ही ते वेगवेगळ्या चवींमध्ये बनवू शकता. चला तर मग आजच्या या लेखात आपण 5 वेगवेगळ्या फ्लेवर्सचे मोदक बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घेऊयात…
पारंपारिक पद्धतीचे उकडीचे मोदक
पारंपारिक मोदक बनवण्यासाठी तुम्हाला तांदळाचे पीठ, पाणी, तूप, मीठ, किसलेले नारळ, गूळ आणि वेलची पूड हे सर्व साहित्य लागणार आहे. प्रथम, गूळ आणि किसलेला नारळ तुपात चांगले परतवा आणि त्यात वेलची पूड टाकून मंद आचेवर शिजवा. आता हे मिश्रण घट्ट झाल्यावर बाहेर काढा. यानंतर एका भांडयात पाणी गरम करत ठेवा व त्या पाण्यात थोडे तुप टाका आणि एक उकळी येऊ द्या. यानंतर त्यात तांदळाचे पीठ टाकून उकड घ्या. आता हे तांदळाचे पीठ थंड झाल्यावर छान मऊ मळून घ्या. त्यानंतर पीठाचा छोटा गोळा घेऊन मोदक साच्यात किंवा हाताने मोदकाचा आकार देऊन त्यात तयार नारळाचे सारण भरा. अशा पद्धतीने मोदक बनवा. आता एका वाफेच्या भांड्यात हे तयार मोदक ठेऊन 15-20 मिनिट वाफेवर शिजवा. थंड झाल्यावर मोदक काढा आणि बाप्पाला नैवेद्य दाखवा.
मावा मोदक
मावा मोदक बनवण्यासाठी तुम्हाला मावा, पिठीसाखर, केशर, वेलची आणि सुकामेवा हे सर्व साहित्य घ्यावे लागेल. आता एका पॅन मध्ये मावा मंद आचेवर भाजून घ्या. त्यात पिठीसाखर, वेलची पावडर आणि केशर मिक्स करून मावा चांगला परतवा. आता हे मिश्रण थंड होऊ द्या. थंड झाल्यावर माव्याच्या मिश्रणाला मोदकाचा आकार द्या. वर सुकामेवा आणि केशरने सजवा.
चॉकलेट मोदक
चॉकलेट मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम डार्क चॉकलेट घ्या. आता हे चॉकलेट ओव्हनमध्ये मेल्ट करून घ्या. तर दुसरीकडे डायजेस्टिव्ह बिस्किटांची पूड तयार करून चॉकलेटमध्ये टाकून मिक्स करा. आता त्यात तूप किंवा बटर टाकून मिश्रण घट्ट झाल्यावर ते मोदक साच्यात भरा आणि मोदक तयार करा. आता हे मोदक एका प्लेट मध्ये काढून सेट होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा. थोड्यावेळाने तुम्ही बाप्पाला चॉकलेट मोदकचा नैवेद्य दाखवू शकता.
खजूरांपासून तयार करा मोदक
तुम्ही साखरेशिवाय मोदक देखील बनवू शकता. यासाठी तुम्हाला खजूर, सुकामेवा, तीळ आणि तूप लागेल. प्रथम पॅनमध्ये सुकामेवा आणि तीळ हलके भाजून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये खजूराची बारीक पेस्ट बनवा. आता एका भांड्यात तूप टाकून खजूराची पेस्ट मंद आचेवर शिजवा. आता त्यात भाजलेला सुकामेवा आणि तीळ टाकून मिश्रण चांगले मिक्स करा. आता हे मिश्रण थंड झाल्यावर साच्यात भरून मोदक तयार करा आणि ते थोडावेळ सेट होऊ द्या. अशापद्धतीने मोदक तयार करून बाप्पाला नैवेद्या दाखवा.
खायचा पानाच्या फ्लेवर्सचे मोदक
पानाच्या चवीचे मोदक बनवण्यासाठी तुम्हाला खवा, गुलकंद, पान पेस्टची हे सर्व साहित्य घ्या. तर प्रथम एका पॅनमध्ये मावा मंद आचेवर भाजून घ्या. त्यात गुलकंद आणि पान पेस्ट टाकून मिश्रण चांगले परतवून घ्या. मिश्रण थंड करा आणि मोदकाच्या साच्याने आकार द्या.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
