नॉनव्हेज प्रेमींनो सावधान! जास्त चिकन खाल्ल्याने होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार
चिकन हे नॉन-व्हेज प्रेमींसाठी आवडीचं खाद्य आहे, पण त्यामागे दडलेला आरोग्याचा धोका तुम्हाला ठाऊक आहे का? नसेल तर शेवटपर्यंत हा लेख नक्की वाचा आणि महत्त्वाची माहिती जाणून घ्या.

जगभरात मोठ्या प्रमाणात लोक चिकन खाण्याचे शौकीन आहेत. चविष्ट आणि पौष्टिक असल्यामुळे ते नॉन – व्हेज प्रेमींच्या थाळीतील एक आवडता पदार्थ आहे. पण आता चिकन प्रेमींसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. इटलीत करण्यात आलेल्या नव्या संशोधनानुसार, आठवड्यात चार वेळा किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात चिकन खाणाऱ्यांमध्ये पोटाच्या कर्करोगाचा (गॅस्ट्रिक कॅन्सर) धोका लक्षणीयरीत्या वाढतो.
संशोधनात काय उघड झालं?
हे संशोधन ‘न्युट्रिएंट्स’ (Nutrients) नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालं असून, यात 4,000 हून अधिक लोकांचा समावेश करण्यात आला होता. सहभागींची वय, आरोग्य स्थिती, जीवनशैलीच्या सवयी आणि वैयक्तिक इतिहासाशी संबंधित माहिती घेण्यात आली. त्याचबरोबर त्यांना डिटेल फूड क्वेश्चनर दिला गेला, ज्यात ते किती प्रमाणात मांस खातात, याची नोंद घेण्यात आली. मांसाचे वर्गीकरण रेड मीट, पोल्ट्री आणि टोटल मीट अशा तीन भागांत करण्यात आलं.
संशोधनाच्या काळात काही सहभागींना गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कॅन्सरशी संबंधित गुंतागुंतींमुळे मृत्यूही झाला. आणि विशेष म्हणजे, अधिक मांस खाणाऱ्यांमध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त आढळलं.
चिकन आणि कॅन्सरचा संबंध
रिसर्चनुसार, आठवड्यात 3000 ग्रॅमपेक्षा जास्त पोल्ट्री खाणाऱ्यांमध्ये मृत्यूचा धोका 27 टक्क्यांनी जास्त होता, त्यांच्या तुलनेत जे आठवड्यात 100 ग्रॅमपेक्षा कमी खात होते. पुरुषांमध्ये हा धोका अधिक असल्याचं संशोधनात दिसून आलं. आठवड्यात 300 ग्रॅमपेक्षा जास्त चिकन खाणाऱ्या पुरुषांमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कॅन्सरमुळे मृत्यू होण्याचा धोका दुप्पट आढळला.
हे का घडतंय? संशोधक काय म्हणतात?
तज्ज्ञांच्या मते, यामागचं नेमकं कारण अजून स्पष्ट नाही. पण त्यांनी काही शक्यता मांडल्या आहेत:
1. ओव्हरकुकिंगचा धोका: चिकन खूप जास्त शिजवल्यास म्यूटेजन्स नावाचे रसायन तयार होतात, जे डीएनएमध्ये बदल (म्युटेशन) घडवून आणू शकतात. हे बदल कधी कधी कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरतात.
2. चाऱ्यातील रसायनं: कोंबड्यांच्या चाऱ्यात वापरले जाणारे हार्मोन्स आणि कीटकनाशके माणसांमध्ये कॅन्सरचा धोका वाढवू शकतात.
3. लैंगिक हार्मोन्सचा फरक: पुरुषांमध्ये धोका जास्त असण्याबाबत संशोधकही साशंक आहेत. त्यांना वाटतं की हार्मोनल फरक यामागे कारणीभूत असू शकतो. उंदरांवर झालेल्या एका स्टडीत स्त्रियांमध्ये असणारा एस्ट्रोजन हार्मोन मेटाबॉलिझम आणि आजाराचा धोका कमी करू शकतो, असं दिसून आलं होतं.
डायट पॅटर्नमध्ये मोठा फरक
संशोधकांच्या मते, पुरुष आणि महिलांच्या आहाराच्या पद्धतीत फरक असतो. स्त्रिया सामान्यतः कमी प्रमाणात खातात, जे तुलनेने त्यांच्यासाठी सुरक्षित ठरू शकतं. त्यामुळे याबाबत आणखी सखोल अभ्यासाची गरज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
पालक आणि नॉन-व्हेज प्रेमींसाठी इशारा
हे संशोधन फक्त आकडेवारी नाही तर एक सावधानतेचा इशारा आहे. नॉन – व्हेज खाणाऱ्यांनी, विशेषतः वारंवार चिकन खाणाऱ्यांनी, आहारात संतुलन राखणं आणि योग्य प्रमाणात मांस सेवन करणं गरजेचं आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
