आता पार्लरला जाण्याची पडणार नाही गरज, घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंनीच करा हेअर स्पा
केसांची काळजी घेणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे असते. त्यामुळे महिला अनेकदा पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही घरी हेअर स्पा करू शकता. जाणून घेऊ घरी हेअर स्पा करण्याची पद्धत आणि त्याचे फायदे

आजच्या काळात प्रत्येकाला सुंदर आणि निरोगी केस हवे असतात. परंतु बदलती जीवनशैली, प्रदूषण आणि रासायनिक उत्पादनामुळे केसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. केस कोरडे निर्जीव आणि कमकुवत होतात. त्यामुळे केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी हेअर स्पा हा उत्तम पर्याय आहे. परंतु पार्लरमध्ये हेअर स्पा करणे महाग असू शकते आणि प्रत्येकाला पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा करणे जमत नाही. जाणून घेऊ घरगुती उपायांनी घरीच हेअर स्पा कसा करायचा. या पद्धती केवळ स्वस्तच नाहीत तर आपले केस नैसर्गिक पद्धतीने चमकदार आणि मजबूत बनवण्यास मदत करतात. जाणून घेऊ पार्लरमध्ये न जाता घरगुती वस्तू वापरून हेअर स्पा कसा करता येईल आणि त्याचे फायदे काय आहेत.
हेअर स्पासाठी घरगुती उपाय
केसांना तेलाने मालिश करा कोमट खोबरेल तेल, बादाम तेल किंवा ऑलिव्ह ऑइल यापैकी कुठल्याही तेलाने केसांना व्यवस्थित मसाज करा. त्यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि केसांना मुळापासून पोषण मिळते.
वाफ घेणे गरम पाण्यात टॉवेल भिजवा. तो पिळून घ्या आणि डोक्याभोवती गुंडाळा. वाफेमुळे केसांची छिद्र उघडता. ज्यामुळे तेल आणि पोषक घटक केसांमध्ये खोलवर जातात.
हेअर मास्क हेअर मास्क तयार करण्यासाठी तुम्ही केळी आणि मधाचा वापर करू शकता. एक पिकलेले केळ घ्या आणि त्यात दोन चमचे मध टाकून पेस्ट बनवा आणि ही पेस्ट केसांना लावून तीस मिनिटे केस तसेच ठेवा. यानंतर केस स्वच्छ धुऊन घ्या. यामुळे केस मऊ आणि चमकदार होतील.
शाम्पू आणि कंडिशनिंग तीस मिनिटांसाठी हेअर मास्क केसांवर तसाच ठेवल्यानंतर सौम्य शाम्पू ने केस धुवा आणि केसांच्या प्रकारानुसार कंडिशनर लावा. हे केस स्वच्छ आणि मॉइश्चराइज करते.
सिरम वापरा केस धुतल्यानंतर किंचित ओल्या केसांवर तुमचे आवडते हलके सिरम लावा. हे केसांना गुंता होण्यापासून वाचवते आणि केसांना चमकवते. सिरम लावल्यानंतर केस विंचरल्यावर केस अगदी सहज मोकळे होतात.
हेअर स्पा केल्याचे फायदे
केसांचे आरोग्य सुधारते हेअर स्पा केसांना चांगले आरोग्य देते. असे केल्याने केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळण्याची समस्या ही कमी होते. हेअर स्पामुळे केसांचा दर्जाही सुधारतो.
कोंडा आणि कोरडेपणा दूर करते अनेकांना कोंड्याची खूप समस्या असते यासाठी हेअर स्पा खूप फायदेशीर आहे. घरी केलेला हेअर स्पा कोरडेपणा आणि कोंड्याची समस्या कमी करण्यास मदत करते.
तणाव कमी होतो हेअर स्पा करताना मसाज केला जातो आणि वाफ दिली जाते. ज्यामुळे डोक्यांच्या स्नायूंना आराम मिळतो त्यामुळे रोजचा ताणही कमी होतो.
केसांना नैसर्गिक चमक मिळते चुकीच्या जीवनशैलीमुळे केसांची चमक कमी होऊ लागते पण नियमित हेअर स्पा केल्याने केसांमध्ये नैसर्गिक चमक परत येते. त्यामुळे केस चमकदार होतात आणि अतिशय सुंदर दिसतात.
