वडापाव, समोसे आवडीने खाताय? थांबा! आता सरकारच देणार हेल्थ अलर्ट
वडापाव, समोसे, कचोरी यांसारखे पदार्थ तुम्ही अत्यंत आवडीने खात असाल तर त्याआधी ही बातमी वाचा. असे पदार्थ खाण्यापूर्वी तुम्हाला एक फलक वाचावं लागणार आहे. ज्यामध्ये त्यातील फॅट आणि शुगर कंटेंट नमूद केलेलं असेल. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

ज्याप्रकारे सिगारेटच्या पाकिटावर धोक्याचा इशारा छापलेला असतो, त्याचप्रकारे आता तेलकट आणि गोड पदार्थांच्या बाबतीतही संभावित धोक्याचं फलक केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या सर्व कार्यालयांमधील उपहारगृहांमध्ये लावले जाणार आहेत. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे. या पदार्थांमध्ये समोसे, वडापाव, कचोरी, पिझ्झा यांचा समावेश आहे. कार्यालयांमधील कँटीनमध्ये तेलकट, गोड सेवनासंदर्भात धोक्याचा इशारा लावण्याचे आदेश केंद्र सरकारने सर्व कार्यालयांना दिले आहेत.
कँटीनमध्ये लावल्या जाणाऱ्या फलकात काय असावं हे परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे. त्यात तेलकट आणि गोड खाद्यपदार्थांच्या चित्रासह त्यापुढे त्यामध्ये किती ‘फॅट’ आहे हेदेखील सांगण्यात यावं. त्यानुसार, एक वडापावमध्ये 10 ग्रॅम फॅट, एक समोशामध्ये 17 ग्रॅम फॅट, दोन कचोरींमध्ये 10 ग्रॅम फॅट, 10 भजींमध्ये 14 ग्रॅम फॅट, 1 गुलाबजाममध्ये 32 ग्रॅम साखर, 1 कोल्ड ड्रींकमध्ये 32 ग्रॅम साखर असल्याचं सांगण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये तेलाच्या वापरात 10 टक्के कपात करण्यात आवाहन केलं होतं. त्याला प्रतिसाद देत केंद्रीय कार्यालयांमधील कँटीनमध्ये तेल आणि गोड पदार्थांबाबत सावधतेचे फलक लावले जाणार आहेत. रोजच्या अन्नातील तेलकट आणि गोड पदार्थांमध्ये फॅट आणि शुगर किती आहे, याची माहिती या फलकाद्वारे दिली जाणार आहे. असे फलक केंद्र सरकारचे कार्यालय, लॉबी, बैठक कक्ष यांसर इतरही सार्वजनिक ठिकाणी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
देशात मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. शहरात पाचपैकी एक प्रौढ व्यक्ती लठ्ठ आहे. याला बालपणापासून असलेल्या आहाराच्या सवयी जबाबदार असतात. लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि काही विशिष्ट कर्करोग यांसारख्या आजारांचा धोका असतो. शिवाय मानसिक आरोग्य, हालचाल आणि लाइफस्टाइलवरही त्याचा परिणाम होतो.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकड्यांनुसार, भारतात 7.7 कोटी लोकांना मधुमेह आहे. 2050 पर्यंत ही संख्या वाढून 44.9 कोटींपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे ‘फिट इंडिया’ अभियानाअंतर्गत भारत सरकारने हे पाऊल उचललं आहे. सरकारचं हे पाऊल लोकांना चांगल्या खाण्यापिण्याच्या सवयींसाठी प्रेरणा देईल आणि ते अधिक जागरुक होतील, असं म्हटलं जात आहे.
