कशी वाढवायची उंची? आहार, व्यायाम आणि झोपेच्या ‘या’ टिप्स करतील कमाल
उंची वाढवायची असेल तर कोणताही शॉर्टकट नाही. मात्र, या काही गोष्टी नियमित केल्यास तुमचं शरीर फिट राहील, उंचीत थोडा फरक पडेल आणि आत्मविश्वासही वाढेल.

लहान उंचीमुळे अनेकजणांची मसकरी उडवली जाते, आत्मविश्वास कमी होतो आणि मनात सतत हीच भावना असते की, “आपली उंची थोडी जास्त असती तर बरं झालं असतं.” खास करून तरुण मुलं आणि मुली याच विचारांनी ग्रासलेले असतात की “उंची कशी वाढवायची?” त्यासाठी काहीजण वेगवेगळ्या गोळ्या, औषधं, टीप्स वापरतात, पण सगळं फेल ठरतं.
खरंतर उंची वाढवणे कोणतंही मिरॅकल नाही. पण काही नैसर्गिक सवयी अंगीकारल्या, तर वयाच्या योग्य टप्प्यात उंची नक्की वाढू शकते. चला तर मग जाणून घेऊया अशा 5 सोप्या टिप्स ज्या तुमच्या उंची वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
1. चांगला आणि पौष्टिक आहार घ्या
तुमचं खाणं जितकं चांगलं असेल, तितका तुमचा शरीरविकास चांगला होतो. प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, झिंक आणि आयर्न हे सगळे घटक उंची वाढवण्यासाठी मदतीचे ठरतात. जेवणात दूध, अंडी, हिरव्या भाज्या, फळं, डाळी यांचा समावेश करा. किशोरवयात (Teenage) उंची वाढण्याचा सर्वात चांगला काळ असतो, कारण तेव्हा हाडं वाढतात. म्हणून या काळात आहाराकडे विशेष लक्ष द्या.
2. पुरेशी झोप घ्या
आपलं शरीर झोपेतच सर्वाधिक वाढतं! हो खरंच रात्री झोपताना शरीरात ‘ग्रोथ हार्मोन’ तयार होतो, जो हाडं आणि स्नायूंची वाढ करतो. जर नीट झोप मिळाली नाही, तर उंची वाढण्याची प्रक्रिया थांबते. त्यामुळे रोज ७-८ तास झोपणं गरजेचं आहे.
3. व्यायाम करा
दररोज सकाळी थोडा व्यायाम करा जसं की पोहणं, सूर्यनमस्कार, पुल-अप्स किंवा बास्केटबॉलसारखे खेळ खेळा. यामुळे तुमच्या पाठीचा कणा (spine) मजबूत होतो आणि शरीर सरळ दिसतं त्यासोबतच बाॅडी स्ट्रेच करणारे व्यायाम करा, कारण ते उंची वाढवायला खूप मदत करतात. त्यामुळे दररोज १०-१५ मिनिटं स्ट्रेचिंग करायला विसरू नका.
4. व्यसनापासून दूर राहा
जर तुम्हाला खरंच उंची वाढवायची असेल, तर धूम्रपान आणि दारू यापासून दूर राहणंच योग्य. यामुळे शरीराचं पोषण थांबतं आणि उंची वाढण्यावर अडथळा येतो.
5. उंची वाढीचं सत्य जाणून घ्या
अनेक लोकांना वाटतं की, कोणतंही पावडर, सिरप किंवा उपाय केल्यावर उंची एकदम वाढेल, पण हे खरं नाही.उंचीचा ६०-८०% भाग आपल्या आईवडिलांच्या जीनवर (genetics) अवलंबून असतो.किशोरावस्थेनंतर (18-20 वर्षांनंतर) शरीराची वाढ थांबत जाते.म्हणूनच योग्य वयात योग्य सवयी अंगीकारल्या, तर उंची वाढू शकते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
