इराण-गाझा नव्हे, आता ‘हा’ देश इस्रायलच्या निशाण्यावर
इस्रायलची दुश्मनी फक्त गाझा, लेबनॉन किंवा सीरियापुरती मर्यादित राहिलेली नाही. हा वाद आता आफ्रिकेपर्यंत पोहोचला आहे. आफ्रिकेतील एक देश आता इस्रायलच्या निशाण्यावर आला आहे.

इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे मध्यपूर्व देशांमधील शांतता भंग झालेली आहे. आता इस्रायलची दुश्मनी फक्त गाझा, लेबनॉन किंवा सीरियापुरती मर्यादित राहिलेली नाही. हा वाद आता आफ्रिकेपर्यंत पोहोचला आहे. आफ्रिकेतील एक देश आता इस्रायलच्या निशाण्यावर आला आहे. इस्रायलचे नवे टार्गेट आता जनरल अब्देल फताह अल-बुरहान आहेत, जे सुदानचे लष्करी हुकूमशहा आहेत, त्यांनी उघडपणे इराणच्या जिहादी नेटवर्कला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ते इस्रायलचे शत्रू बनले आहेत.
अब्देल फताह अल-बुरहान आता इराण, हमास आणि मुस्लिम ब्रदरहूडसारख्या संघटनांसोबत चर्चा करत आहे. आता सुदान ड्रोन तंत्रज्ञान, शस्त्रास्त्र पुरवठा आणि दहशतवादी नेटवर्कचे एक नवीन केंद्र बनले आहे. तसेच सुदानची राजधानी खार्तूममध्ये अनेक इराणी एजंट सक्रिय आहेत, ते लाल समुद्रातून शस्त्रास्त्र पाठवत असल्याचे समोर आले आहे.
इराण इस्रायलला सर्व बाजूंनी वेढण्याच्या तयारीत
इराणने आपली योजना स्पष्ट केली आहे. इराण सर्व बाजूंनी इस्रायलला वेढा घालण्याच्या तयारीत आहे. इराक, सीरिया, लेबनॉन आणि येमेननंतर आती सुदान इराणसाठी एक नवीन दहशतवादी कॉरिडॉर बनले आहे. सुदानची भौगोलिक परिस्थितीही यासाठी योग्य आहे. कारण हा देश लाल समुद्रालगत आहे. त्यामुळे सुदान इराणसाठी लॉजिस्टिक्स हब बनत आहे.
खार्तूम हे हमासचे नवे घर
इस्रायलने हमासवर मोठी कारवाई केली होती. त्यामुळे हमासचे अनेक नेते-कार्यकर्ते सुदानमध्ये आश्रय घेत आहेत. खार्तूम शहरात एक नवीन हमास नेटवर्क तयार होत आहेत. या ठिकाणावरून भविष्यात नवीन योजना आखल्या जाणार आहेत. त्यामुळे इस्रायलचे शत्रू आता नवीन ठिकाणावरून हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. अब्देल फताह अल-बुरहानने हमास आणि इराणला मदत केल्यामुळे सुदान आता इस्रायलचा नवा शत्रू बनला आहे.
‘या’ देशांनाही धोका
अल-बुरहान आणि इराण यांच्यातील मैत्रीमुळे इजिप्त, सौदी अरेबिया आणि युएई हे देशही सतर्क झाले आहेत. इस्रायलसाठी हा मुद्दा केवळ राजकारणाचा नसून अस्तित्वाचा आहे. त्यामुळे इस्रायल आगामी काळात सुदानवरही कारवाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
