अमेरिकेच्या हल्ल्याने खवळलेल्या इराणची इस्रायलवर मोठी Action, एकाचवेळी 10 शहरात…
अमेरिकेनं इराणच्या अणुसंशोधन केंद्रांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यांनंतर इराण चांगलाच खवळला असून त्याने इस्रायलवर मोठा हल्ला केला आहे. इराणकडून इस्रायलच्या दिशेने किमान 30 क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत

अमेरिकेनं इराणच्या तीन अणुसंशोधन केंद्रांवर हल्ला केल्यानंतर आता इराणनेही इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. इराणकडून इस्रायलच्या दिशेने किमान 30 क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. इराणने केलेल्या या हल्ल्यांचे आवाज तेल अवीव, हैफा आणि जेरुसलेममध्ये ऐकू आले. तसंच इस्रायलच्या अनेक भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आणि सायरन वाजत आहेत. अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर इराण अधिकच आक्रमक झाला आहे. यामुळे निर्माण झालेल्या धोक्यांना पाहता इस्रायली अधिकाऱ्यांनी जनतेला होम फ्रंट कमांडच्या सूचनांचं पालन करण्यास सांगितलं आहे.
इस्रायलला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणने 10 हून अधिक शहरांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. या शहरांमध्ये राजधानी तेल अवीव आणि हैफासारखी शहरंदेखील समाविष्ट आहेत. इराणकडून होणाऱ्या या हल्ल्यांमुळे इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये सायरनचा आवाज सतत ऐकू येत आहे. लोकांना बॉम्ब शेल्टरमध्ये आश्रय घ्यावं लागत आहे. तेल अवीवसारख्या प्रमुख शहरांमध्ये लोकांना सतत अलर्ट पाठवून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यास सांगितलं जात आहे.
अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांनंतर इराणने म्हटलंय की त्यांच्या अणुसंशोधन केंद्रांना कोणतंही नुकसान झालेलं नाही आणि नागिरकांना रेडिएशनचा धोका नाही. तर दुसरीकडे ट्रम्प यांनी आपल्या भाषणात हल्ले यशस्वी झाल्याचं म्हटलंय आणि इराणला शांततेकडे वाटचाल करण्यास सांगितलं आहे. अमेरिकेनं प्रमुख अणुप्रकल्पांवर केलेल्या हल्ल्यांनंतर आजूबाजूच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना कोणताही धोका नसल्याचं, इराणच्या सरकारी माध्यमांनी स्पष्ट केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, इराणच्या फोर्डो अणुसंशोधन केंद्रावरील हल्ल्यात सहा बंकर बस्टर बॉम्बचा वापर करण्यात आला. इराणच्या अणुऊर्जा संघटनेनं (AEOI) याला आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन म्हटलं आहे. इराणने आंतरराष्ट्रीय समुदायाला या हल्ल्यांचा तीव्र निषेध करण्याचं आवाहन केलं आहे. अमेरिकेनं इराणविरुद्ध केलेल्या या कारवाईवर संयुक्त राष्ट्रांचं सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी याला आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी थेट धोका असल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन केलं. तर इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी इस्रायली सैन्याचं अभिनंदन केलं.
