Pakistan Blast : पाकिस्तान हादरला, एकाचदिवशी तीन शक्तीशाली बॉम्बस्फोट, किती निरपराधांचा मृत्यू?
Pakistan Blast : पाकिस्तान पुन्हा एकदा हादरला आहे. एकाच दिवशी तीन शक्तीशाली बॉम्बस्फोट झाले. यात अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. पाकिस्तानने जो दहशतवादाचा भस्मासूर उभा केला, आता तोच त्यांच्यावर उलटला आहे. येणारे दिवस पाकिस्तानसाठी कठीण असणार आहेत.

पाकिस्तानात मंगळवारी तीन घातक हल्ले झाले. यात 22 लोकांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, यात एक आत्मघाती हल्ला बलूचिस्तानच्या रॅलीमध्ये झाला. यात एका हल्लेखोराने स्वत:ला स्फोटामध्ये उडवून घेतलं. यात कमीत कमी 11 नागरिकांचा मृत्यू झाला. राजधानी क्वेटा येथे एका स्टेडिअमच्या पार्किंग एरियात बॉम्बस्फोट झाला. यात 40 लोक जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. पार्किंग एरियात बलूचिस्तान नॅशनल पार्टीचे (BNP) अनेक सदस्य उपस्थित होते.
इराणच्या सीमेजवळ बलूचिस्तान आहे. मंगळवारी तिथे आणखी एक हल्ला झाला. यात 5 लोकांचा मृत्यू झाला. चार जण जखमी झाले. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांचा ताफा इराणच्या सीमेजवळ एका जिल्ह्यातून जात होता, त्यावेळी बॉम्ब स्फोट झाला. यात पाच लोकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदारी अजून कुठल्याही गटाने स्वीकारलेली नाही.
12 तास आतमध्ये सुरु होता गोळीबार
खैबर पख्तूनख्वा प्रांतात एका तळावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात सहासैनिकांचा मृत्यू झाला. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकाने भरलेली गाडी एफसीच्या गेटवर धडकवली. त्यानंतर पाच आत्मघातकी हल्लेखोर आतमध्ये घुसले. त्यानंतर 12 तास आतमध्ये गोळीबार सुरु होता, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. या गोळीबारात 6 हल्लेखोर मारले गेले. इत्तेहाद-उल-मुलजाहिदीन पाकिस्तानने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
782 नागरिकांचा मृत्यू
न्यूज रिपोर्टच्या आकड्यांनुसार, बलूचिस्तान आणि शेजारच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात बंडखोर गटांनी केलेल्या हिंसाचारात 430 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. मारले गेलेले बहुतांश सदस्य सुरक्षा पथकाचे सदस्य आहेत. पाकिस्तानने दहशतवादाचा भस्मासूर उभा केला. आता तोच त्यांच्यावर उलटला आहे. पाकिस्तानने उभ्या केलेल्या दहशतवादी संघटना त्यांच्याच विरोधात लढत आहेत. 2024 साली या क्षेत्रात हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढला. त्यात 782 नागरिकांचा मृत्यू झाला.
बलूचिस्तान लिबरेशन आर्मी दहशतवादी संघटना घोषित
बलूचिस्तानात अनेक वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. पाकिस्तानची स्थापना झाल्यापासून बलूचिस्तान तिथल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे. बलूचिस्तान लिबरेशन आर्मी मागच्या अनेक दशकांपासून पाकिस्तान विरोधात लढत आहे. पाकिस्तानकडून बलूचिस्तानच्या नैसर्गिक साधन संपत्तीची लूट सुरु आहे, असं तिथल्या स्थानिक बलूच नागरिकांच मत आहे. त्यामुळे इतकी वर्ष ते पाकिस्तान विरोधात लढत आहेत. पाकिस्तानी सैन्यावर मागच्या काही महिन्यात बलूचिस्तानात मोठ्या प्रमाणावर हल्ले झाले आहेत. मागच्या महिन्यात अमेरिकेने BLA म्हणजे बलूचिस्तान लिबरेशन आर्मीला दहशतवादी संघटना घोषित केलं. पाकिस्तानच्या दक्षिण प्रांतात सक्रीय असलेल्या बलूचिस्तान लिबरेशन आर्मीबद्दल अमेरिकेने हा निर्णय घेतला.
