व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनलाही मोठा धक्का, ड्रॅगन बॅकफूटवर
ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर केलेल्या सैन्य कृतीने चीनचे तैवानबाबतचे समीकरण बदलणार का ? असा प्रश्न एका विश्लेषकाने उपस्थित केला असून त्यामुळे चीनच्या महत्वाकांक्षांना धक्का बसला आहे. बीजिंगसाठी हा एक सामरिक धक्का मानला जात आहे.

शनिवारी पहाटे अमेरिकेने लॅटीन अमेरिकन देश व्हेनेझुएलावर जोरदार हल्ला करीत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना थेट राष्ट्रपतीभवनातून उचलून नेले. त्यानंतर आता अमेरिकेने व्हेनेझुएलात सत्तापालट करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. परंतू या हल्ल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी एक तीर दोन निशाण असे कृत्य केल्याचे म्हटले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला यामुळे मोठा हादरा दिल्याचे म्हटले जात आहे.
व्हेनेझुएला या देशातील हुकूमशाही व्यवस्था उलथवण्यासाठी अमेरिकेने अंमलीपदार्थ आणि शस्रास्रांच्या गैरव्यवहार प्रकरणांचा आधार घेत मोठी सैन्य कारवाई केली आहे. यामुळे आता अमेरिका व्हेनेझुएलात सत्तापालट करण्याचा प्रयत्न करणार आहे. सध्या या हल्ल्याचा निषेध चीन आणि रशिया यांनी केला असून हा हल्ला व्हेनेझुएलाच्या सार्वभौमत्वाला धक्का असल्याचे म्हटले आहे. मात्र, अर्जेंटीना या देशाने मात्र अमेरिकेच्या कारवाईचे स्वागत केले आहे.
या व्हेनेझुएला देशावर केलेल्या सैन्य कारवाईनंतर धोरण विश्लेषक जे. मायकल वॉलर यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी केलेल्या विश्लेषणानुसार व्हेनेझुएलाबाबतच्या अमेरिकेच्या कारवाईमुळे चीनला मोठा धक्का बसला आहे. चीनचे हितसंबंध तैवानमध्ये गुंतलेले आहेत. आता चीनच्या तैवानवरील संभाव्य आक्रमणाच्या धोरणाला त्यामुळे अडथळा निर्माण झाल्याचे मायकल वॉलर यांनी म्हटले आहे.
एक्सवरील ( आधीचे ट्वीटर ) एका पोस्टमध्ये वॉलर यांनी म्हटले आहे की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारवाईने बीजिंगचा महत्त्वपूर्ण ऊर्जा पुरवठ्यावरील अधिकार मर्यादित झाला आहे. त्यामुळे इंडो-पॅसिफिकमध्ये मोठे युद्ध सुरू करण्यासाठी चीनला गरज असलेल्या आर्थिक आणि लष्करी स्थितीला धक्का बसला आहे.
“व्हेनेझुएलावर कारवाई करून आणि इराणी विरोधकांना मदत करून, डोनाल्ड ट्रम्प यांनी तैवानवरील चीनचे संभाव्य आक्रमण रोखले असावे,” असे वॉलर यांनी लिहिले आहे. चीन व्हेनेझुएलाकडून तेल आयात करतो. चीनचे हे तेल आयातीवरील मोठे अवलंबित्व असल्याने आणि ते अमेरिकेच्या प्रभावाच्या बाहेरचे असलेले आहे. आणि चीनची ही कमकुवत नस वॉशिंग्टनने पकडली आहे असे वॉलर यांनी म्हटले आहे.
चीनचे ऊर्जेवरील अवलंबित्व
चीन सध्या व्हेनेझुएलाकडून ६०% ते ९०% आणि इराणकडून ८५% ते ९०% कच्चे तेल आयात करतो. चीनला पुरवण्यात येणारा हा तेल साठा चीनच्या एकूण तेल आयातीच्या अंदाजे ३०% ते ३५% आहे. चीनचे अतिरिक्त ३५% तेल अरब देशांकडून येते, हे देश अमेरिकेच्या राजनैतिक प्रभावाखाली आहेत, असेही वॉलर यांनी लिहिले आहे.
“व्हेनेझुएला आणि इराणमध्ये नवीन सरकारे स्थापन झाल्यास,अमेरिका चीनच्या सध्याच्या तेलाच्या गरजांपैकी ७०% पर्यंत तेल रोखू शकेल,” असे वॉलर यांनी लिहिले. अशाप्रकारच्या या नियंत्रणामुळे बीजिंगची जोखम वाढली असल्याचा युक्तिवाद वॉलर यांनी केला आहे. त्यामुळे आता चीन या परिस्थितीत तैवानविरुद्ध कारवाई करू शकत नाहीत.”
