डोनाल्ड ट्रम्प यांची शरणागती, थेट मानली हार, म्हणाले, मी स्वर्गात जाणार नाही, कारण…
डोनाल्ड ट्रम्प कधी काय निर्णय घेतील, याचा नेम राहिला नाही. डोनाल्ड ट्रम्प सतत चर्चेत आहेत. जगावर टॅरिफचे मोठे संकट त्यांनी लादले आहे. याचा फटका फक्त भारतच नाही तर अमेरिकेला बसताना देखील दिसतोय. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फायनली इस्त्रायलच्या दाैऱ्यावर आहेत. हमास-इस्त्रायल युद्धबंदीनंतर डोनाल्ड ट्रम्प आणि इस्त्रायलमधील जवळीकता चांगलीच वाढल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनाच नोबेल शांतता पुरस्कार मिळाला, याकरिता ते आग्रही होते. गाझा शांतता शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील निमंत्रण पाठवले. मोठ्या टॅरिफनंतरही भारत-अमेरिकेतील संबंध पूर्वीसारखे राहावे, याकरिता डोनाल्ड ट्रम्प प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, नरेंद्र मोदी या परिषदेसाठी जाणार नसून त्यांचे प्रतिनिधी पाठवले जातील, असे भारताने स्पष्ट केले. भारताला शेवटच्या क्षणी या परिषदेचे निमंत्रण देण्यात आले.
यादरम्यान पत्रकारांसोबत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, सध्याच्या स्थितीमध्ये त्यांचे कोणतेही प्रयत्न हे त्यांना स्वर्गात पोहोचवू शकत नाहीत. ट्रम्प यांनी कबूल केले की, ते कदाचित स्वर्गात जाण्यासाठी बनलेच नाहीत. यादरम्यान त्यांनी म्हटले की, पण ठीक आहे…मला वाटते की, मी अनेक लोकांचे जीवन चांगले केले आहे. गाझा पट्टी शांततेवर बोलताना ते म्हणाले की, कदाचित माझ्या आयुष्यातील हे सर्वात मोठे मिशन होते.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या 20 कलमी प्रस्तावानुसार पहिल्या टप्प्यात 20 ओलिस ठेवलेल्या लोकांची सुटका केली जाणार आहे. मुळात म्हणजे हे ओलिस ठेवलेले लोक अशा ठिकाणी होते की, त्याबद्दल कोणी विचारही करण्याचा प्रयत्न करणार नाही. डोनाल्ड ट्रम्प गाझा पट्टीतील लोकांबद्दल बोलताना म्हटले की, सर्वात अगोदर त्या लोकांची काळजी घेतली जाईल. पुढील काही वर्षानंतर इथे खूप काही चांगले बघायला मिळेल.
एका पत्रकाराने डोनाल्ड ट्रम्प यांना म्हटले, तुम्ही म्हटले होते की युक्रेनमधील युद्ध संपवण्याची आशा आहे कारण ते तुम्हाला स्वर्गात जाण्यास मदत करू शकते. यावर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, मला वाटत नाही की मी स्वर्गात जाऊ शकेल. मला वाटते की कदाचित मी स्वर्गासाठी नाहीये… कदाचित मी सध्या स्वर्गात आहे, एअर फोर्स वनमध्ये उड्डाण करत आहे. मी स्वर्गात पोहोचेन किंवा नाही. पण मी अनेक लोकांचे जीवन खरोखरच चांगले बनवले असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.
