War : डोनाल्ड ट्रम्प चिंतेत! बड्या देशाची गर्जना, अमेरिकेचे लष्करी तळ उडवण्याची धमकी
US Iran Tension : इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद बाकर गालिबाफ यांनी एक तातडीची बैठक बोलवली होती. या बैठकीत त्यांनी अमेरिकेने हल्ला केल्यास आम्ही त्यांची लष्करी तळे उडवू असं गालिबाफ यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही काळापासून जगातील अनेक देशांमधील तणाव वाढला आहे. इराण आणि अमेरिकेत युद्ध पेटण्याची शक्यता आहे. इराणमधील जनता सध्या सरकार विरोधात रस्त्यावर उतरलेली आहे. संपूर्ण देशात आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांना रोखण्यासाठी सरकारने गोळीबार केल्याचे समोर आले आहे. यात अनेक आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. यावरून अमेरिकेने आंदोलकांवर इराणी सरकारने हल्ला करू नये अन्यथा अमेरिकन सैन्य इराणमध्ये उतरण्यास तयार असल्याचा इशारा दिला होता. तसेच अमेरिका इराणवर हल्ला करण्याची शक्यता आहे अशी चर्चाही जगात सुरू आहे. यावर आता इराणने उत्तर दिले आहे.
इराणचा अमेरिकेला इशारा
इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद बाकर गालिबाफ यांनी एक तातडीची बैठक बोलवली होती. या बैठकीत त्यांनी सांगितले की, इराण सध्या इस्रायल आणि अमेरिकेशी थेट संघर्ष करत नाही तर आर्थिक, मानसिक आणि लष्करी-दहशतवादी संघर्षांनाही तोंड देत आहे. अमेरिकेला इशारा देताना गालिबाफ म्हणाले की, ‘जर अमेरिकेने इराणवर लष्करी हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार नाही. अशा परिस्थितीत इस्रायल आणि मध्य पूर्वेतील अमेरिकन लष्करी आणि नौदल तळांवर इराण हल्ला करेल.
गालिबाफ यांनी म्हटले की, इराणवर विविध मार्गांनी दबाव टाकला जात आहे, त्यामुळे देशाला एकाच वेळी अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. हा संघर्ष केवळ शस्त्रांपुरता मर्यादित नाही तर त्यात आर्थिक निर्बंध आणि सुरक्षा धोके यांचा समावेश आहे. त्यामुळे आता अमेरिकेने इराणवर जर हल्ला केला तर इराणकडून जशास तसे उत्तर दिले जाण्याची शक्यता आहे.
इराण सज्ज
इराणने याआधीही सांगितले आहे की, आमच्या देशावर हल्ला झाला तर जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. यातून असे स्पष्ट होते की इराण युद्धासाठी पूर्णपणे सज्ज आहे. त्यामुळेच अमेरिका आणि इस्रायलला उघडपणे इशारा दिला जात आहे. यापूर्वी अशा बातम्या आल्या होत्या की, इराणने त्यांच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सना सतर्क ठेवले आहे. इराणने जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे देखील तैनात केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता इस्रायल आणि अमेरिकेची चिंता वाढली आहे.
