कारागृहात मला काही झाले तर आसीम मुनीर जबाबदार, पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांचा लष्करप्रमुखांवर गंभीर आरोप
कारागृहात मला काही झाले तर त्याला आसीम मुनीर जबाबदार असणार आहे. मी माझे संपूर्ण जीवन कारागृहात घालवण्यास तयार आहे. परंतु अत्याचार आणि दबावापुढे झुकणार नाही, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान तुरुंगात आहेत. त्यांना तुरुंगात त्यांच्यासोबत काही घातपात होण्याची भीती वाटत आहे. यामुळे त्यांनी त्यांच्या तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या सदस्यांना सांगितले की, जर तुरुंगात त्यांच्यासोबत काही अनुचित प्रकार घडला तर त्यासाठी लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर जबाबदार असतील. क्रिकेटरपासून पंतप्रधानपदापर्यंत गेलेले इम्रान खान ऑगस्ट २०२३ पासून तुरुंगात आहे. त्यांची सुटका करण्यासाठी शाहबाज शरीफ सरकार आणि लष्करी यंत्रणेवर दबाव आणण्यासाठी त्यांच्या पीटीआय पक्षाकडून ५ ऑगस्टपासून देशभरात मोठी मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
इम्रान यांनी काय म्हटले?
‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये इम्रान खान यांनी म्हटले की, अलिकडच्या काळात तुरुंगात मला कठोर वागणूक दिली जात आहे. माझी पत्नी बुशरा बीबी हिच्याविरुद्धही अशीच वृत्ती अवलंबली जात आहे. तुरुंगातील आमच्या सेलमध्ये असणारा टीव्ही बंद करण्यात आला आहे. आम्हाला आमच्या अधिकाऱ्यांपासून वंचित ठेवले जात आहे. सामान्य कैद्यांना दिले जाणारे अधिकारही आम्हाला दिले जात नाही.
जुलमी व्यवस्थेसमोर झुकू नका
इम्रान खान यांनी पुढे म्हटले की, लष्करप्रमुख आसीम मुनीर यांच्या आदेशावरुन आम्हाला त्रास दिला जात आहे. एक कर्नल आणि कारागृह अधीक्षक मुनीर यांच्या आदेशानंतर आमचे अधिकारही आम्हाला देत नाही. यामुळे मी पक्षाच्या सदस्यांना सांगू इच्छितो कारागृहात मला काही झाले तर त्याला आसीम मुनीर जबाबदार असणार आहे. मी माझे संपूर्ण जीवन कारागृहात घालवण्यास तयार आहे. परंतु अत्याचार आणि दबावापुढे झुकणार नाही. पाकिस्तानच्या जनतेला माझा एकच संदेश आहे, कोणत्याही परिस्थितीत या जुलमी व्यवस्थेसमोर झुकू नका, असे इम्रान खान यांनी म्हटले.
इम्रान खान यांनी सरकारसोबत चर्चा करण्याची वेळ आता संपली असल्याचे म्हणत देशव्यापी आंदोलन उभारण्याची घोषणा केली. त्यांनी म्हटले की, कारागृहात माझ्यापेक्षा चांगली वागणूक दहशतवादी आणि हत्येचा आरोप सिद्ध झालेल्या लोकांना दिली जात आहे. इम्रान खानची बहीण अलीमा खान हिने पीटीआय सदस्यांना सांगितले की, इम्रान खान यांनी संदेश पाठवला आहे की, कारागृहात त्यांना काही झाले तर आसीम मुनीर यांना जबाबदार धरण्यात यावे.
