महापूरात सगळं वाहून गेलं, मात्र नेपाळमधील हे हिरवं घर कसं ताठ उभं! तुम्हालाही असंच मजबूत घर हवंय का? करणार काय?
Nepal Flood Green House: नेपाळमधील महापूरात संपूर्ण गाव बेचिराख झाले. पण 40 वर्षे जुने दोन ते तीन मजली घर मात्र ताठ उभं दिसले. सगळ्या बाजूने पुराचे तडाखे बसत असतानाही हे घर डगमगलं नाही. तुम्हालाही असंच मजबूत घर हवं आहे का? काय आहे त्यामागील रहस्य?

नेपाळमधील बागमती भागातील लंगटांग लिरूंग हिमनगाचा एक मोठा तुकडा त्रिशुली नदीच्या पात्रात पडला. त्यामुळे विनाशकारी महापूर आला. पाणी, ढिगारा आणि दगडांमुळे पाण्याला अटकाव झाला. पाण्याचा दबाव वाढताच मोठी आपत्ती कोसळली. महापूरात काडी कचऱ्याप्रमाणे गावं, शाळा, हॉटेल वाहून गेल्या. या भीषण नैसर्गिक संकटात एक चमत्कार घटना समोर आली. नेपाळमधील नुवाकोट जिल्ह्यातील देवीघाट परिसरातील घराची जगभरात चर्चा झाली. सर्व बाजूने काळेकुट्ट महापूराचे पाणी, चिखल, दगड आणि पुराच्या पाण्याचे तडाखे बसत असताना हे घर ऐटीत उभे होते. या हिरव्या रंगाच्या घराने महापूराचा माज उतरवला. प्रकाश पांडे प्याकुरले यांच्या या इमारतीच्या मजबुतीची चर्चा सुरू झाली.
महापूरात का वाहून गेले नाही घर?
घर मालक प्रकाश पांडे प्याकुरले यांनी याविषयीची माहिती दिली. हिमालयाच्या कुशीत असल्याने थंड हवामान असते. त्यामुळे घराचे बांधकाम हे उष्णतारोधक असते तर उभा भार पेलू शकणार्या तंत्राचा आणि संरचनेला प्राधान्य देण्यात येते. त्यांच्या पूर्वजांनी अगोदरच त्रिशुली नदीच्या भौगोलिक आणि पूराचा धोका ओळखला होता. त्यामुळे घर तयार करतेवेळी त्यांनी जमिनीखाली दोन मजल्या इतके खोदकाम केले. पाया खोदला. तिथे त्यांनी मजबूत पाया तयार केला. या मजबूत पायामुळेच त्यांचे घर या भीषण आणि विनाशकारी महापूरात ताठ कण्याने उभे राहिले. ते कोसळले नाही. ढासळले नाही की वाहूनही गेले नाही.
या गोष्टींमुळे महापूरात वाचले घर
कोणतीही इमारत महापूरात अथवा नैसर्गिक आपत्तीत टिकण्यासाठी काही तांत्रिक बाबींचा आणि भौगोलिक कारणांचा विचार करणे गरजेचे आहे. हे हिरवे घर महापूरात टिकण्यामागे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्याचा मजबूत पाया (Foundation), त्याचे रेनफोर्स्ड कॉक्रींट, सिमेंट आणि स्टीलचे पिलर फ्रेमवर्क हे आहेत. याशिवाय या घराच्या खाली जे दोन मजले होते. त्याच्या विटा पुराच्या तडाख्यात वाहून गेल्या आणि पाण्याला अटकाव झाला नाही. पाणी आणि मातीचे ढिगारे, दगड वाहून जाऊ शकले. यामुळे घराच्या पिलर्सवरील, खांबावरील ताण अत्यंत कमी झाला. हे घर मुख्य प्रवाहापासून थोडे अंतरावर असल्याने त्याला महापूराचा एकदम फटका बसला नाही.
Terrifying footage shows a flash flood sweeping through the Nepal–Tibet border, trapping people on rooftops and balconies. At least 469 have been killed, with hundreds still missing. pic.twitter.com/xRgRWmwut7
— Weather Monitor (@WeatherMonitors) August 28, 2026
घर बांधताना काय काळजी घ्याल?
सर्वात महत्त्वाचे म्हणजे नदीच्या एकदम काठावर घर बांधू नका. नदीपात्रात अतिक्रमण करू नका. पण नदीच्या शेजारील परिसरात घर बांधताना त्याचा पाया अधिक खोल आणि मजबूत असण्यावर भर द्या. योग्य आणि दर्जेदार साहित्य, सिमेंटचा वापर करा. भूकंपगतिरोधक आणि महापूराचा धोका कमी करणारे स्ट्रक्चर तयार करून घ्या. त्यानुसार घर बांधा. स्ट्रक्चरल ऑडिट जरूर करा. घर बांधताना किती मजले बांधायचे त्यानुसार पाया आणि खांबाची मजबुती ठरवा.
