Donald Trump : ‘मी तिसरं विश्व युद्ध…’, ट्रम्प पक्के बिझेनसमॅन, शपथविधी आधी मोठं वक्तव्य
Donald Trump : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आज देशाची कमान संभाळणार आहेत. ट्रम्प आज राष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत. शपथ ग्रहण सोहळ्याआधी त्यांनी विक्ट्री रॅलीला संबोधित केलं. ट्रम्प यांनी या दरम्यान काही महत्त्वाची वक्तव्य केली आहेत.

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आज म्हणजे 20 जानेवारीला राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 47 वे राष्ट्रपती असतील. भारतीय वेळेनुसार, रात्री 10.30 वाजता डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला सुरुवात होईल. शपथविधी सोहळ्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये विक्ट्री रॅलीला संबोधित केलं. या रॅलीमध्ये ट्रम्प यांनी टिकटॉक App ते युक्रेन-रशियामध्ये सुरु असलेल्या युद्धाबद्दल त्यांची काय भूमिका आहे? ते स्पष्ट केलं.
मेक अमेरिका ग्रेट अगेन (एमएजीए) रॅली मध्ये नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “देशाचा कार्यभार संभाळण्याआधी तुम्ही अशा गोष्टी बघताय ज्याची कोणाला अपेक्षा नव्हती. प्रत्येक जण याला ट्रम्प इफेक्ट म्हणतोय. पण हे तुम्ही आहात, हा तुमचा इफेक्ट आहे. टिकटॉक पुन्हा आलय. आपल्याला टिकटॉकला वाचवण्याची गरज आहे. कारण आपल्याला भरपूर साऱ्या नोकऱ्या वाचवायच्या आहेत” डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणातील 10 मुद्दे जाणून घेऊया.
– अमेरिकेत बेकायदरित्या राहणाऱ्यांना बाहेर काढणार. घुसखोरी होऊ नये, यासाठी कडेकोट बंदोबस्त असेल.
– आम्हाला चीनला आपला बिझनेस द्यायचा नाहीय. आम्हाला भरपूर साऱ्या नोकऱ्या वाचवायच्या आहेत.
– अमेरिकेला पुन्हा महान राष्ट्र बनवणार. अमेरिकेची ताकद वाढवणार, गौरव प्राप्त करुन देणार. – इस्रायल-हमास युद्धविराम हा अमेरिकेचा ऐतिहासिक विजय आहे. आमच्यामुळे हा करार झालाय.
– आम्हाला टिकटॉक आवडतं. हे वाचवण्याची गरज आहे. अमेरिकेत पुन्हा टिकटॉक सुरु झालं आहे. अमेरिकेची टिकटॉकमध्ये 50 टक्के मालकी असेल, या अटीवर टिकटॉक सुरु करायला परवानगी दिली आहे.
– आम्ही आपल्या शाळेत देशभक्ती वाढवणार आहोत. आपलं सैन्य आणि सरकारमधून कट्टरपंथीय, डावी तसेच जागृत विचारधारा बाहेर काढणार आहोत.
– निवडणुकीत झालेल्या आपल्या विजयाबद्दल डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “अमेरिकेच्या इतिहासातील हे सर्वात मोठ राजकीय आंदोलन होतं. 75 दिवस आधी आम्ही आपल्या देशातील सर्वात मोठा राजकीय विजय मिळवला आहे”
– “मी रशिया-युक्रेन युद्ध संपवणार. मी मध्य पूर्वेतील अराजकता रोखणार. मी तिसरं विश्व युद्ध होऊ देणार नाही” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
– शपथविधी आधी विक्ट्री रॅलीमध्ये डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, ‘मध्य पूर्वेत अराजकता संपवणार, तिसरं विश्व युद्ध होऊ देणार नाही’