इराणनंतर आता तुर्कीने घेतली इस्रायलची धास्ती; एर्दोगानचा बीपी वाढला, जर्मनीकडे केली मोठी मागणी
इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे, त्यामुळे मध्य पूर्वेमधील तणाव आता शिगेला पोहोचला आहे. हे युद्ध आता केवळ मध्य पूर्वेसाठीच नाही तर जगासाठी चिंतेचा विषय ठरलं आहे.

इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे, त्यामुळे मध्य पूर्वेमधील तणाव आता शिगेला पोहोचला आहे. हे युद्ध आता केवळ मध्य पूर्वेसाठीच नाही तर जगासाठी चिंतेचा विषय ठरलं आहे. इराण आणि इस्रायल युद्धाची झळ केवळ या दोन देशालाच नाही तर या देशांच्या शेजारी असलेल्या देशांना देखील आता बसू लागली आहे. या युद्धामुळे तुर्कस्तानचं टेन्शन वाढलं आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी या मुद्दावर जर्मनचे चांसलर फ्रेडरिक मर्झ यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यांनी या युद्धाबाबत चिंता व्यक्त केली आहे. हे युद्ध आमच्या सुरक्षेसाठी मोठा धोका ठरत असल्याचं एर्दोगान यांनी म्हटलं आहे.एर्दोगान यांना हे युद्ध तुर्कीसाठी धोक्याची घंटा वाटत असून, त्यांना तीन धोके जाणवत आहेत.
पहिला धोका म्हणजे त्यांना इस्रायलकडून होणाऱ्या हल्ल्याची भीती वाटत आहे. कारण इस्रायलकडून इराणवर जो मिसाईल हल्ला सुरू आहे, त्यामुळे तुर्कीचं देखील मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. तुर्की हा इराणचा शेजारी देश आहे.
दुसरा धोका आहे, स्थलांतरणाचा – तुर्की हा इराणच्या एकदम जवळचा देश आहे, इस्रायलकडून इराणवर हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यामुळे मोठ्या संख्येनं इराणचे नागरिक तुर्कीमध्ये स्थलांतर करण्याची शक्यता आहे. जर तसं झालं तर तुर्कीची इकोनॉमी बिघडू शकते अशी भीती एर्दोगान यांना वाटत आहे.
तिसरा धोका म्हणजे त्यांना अणू बॉम्ब हल्ल्याची चिंता सतावत आहे. जर समजा उद्या इस्रायलने इराणवर अणू हल्ला केला तर या हल्ल्यामध्ये तुर्कीचं देखील मोठं नुकसान होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज एर्दोगान यांनी जर्मनीच्या चांसलर यांना फोन करून चर्चा केली.
एर्दोगान यांनी यावेळी जर्मनीच्या चांसलर यांना फोनवरून या युद्धावर लवकरात लवकर चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याची विनंती केली आहे, आम्हाला मध्यपूर्वेमध्ये शांतता हवी आहे, आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायासोबत आहोत. सध्या परिस्थिती बिघडत असून, लवकरात लवकर युद्धविरामावर चर्चा होणं गरजेच असल्याचं एर्दोगान यांनी म्हटलं आहे.
