शस्त्रसंधी मोडून शेवटच्या दोन-चार मिसाईल डागल्या, इस्रायलने इराणचा मोठा मोहरा संपवला!
इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध आता थांबले आहे. मात्र इस्रायलने एअर स्ट्राईक करून इराणची मोठी हानी केली आहे.

एकमेकांवर क्षेपणास्त्र, बॉम्ब डागल्यानंतर आता इराण आणि इस्रायल यांच्यात शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकाराने या दोन्ही राष्ट्रांनी युद्धविरामाची घोषणा केली आहे. असे असले तरी या दोन्ही देशांचे एकमेकांवरचे हल्ले काही थांबलेले नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार शस्त्रसंधी झालेली असूनही इराणमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले झाले आहेत. विशेष म्हणजे या हल्ल्यात इराणच्या सैन्यातील मोठा कमांडर मारला गेला आहे. त्यामुळे आता शस्त्रसंधी झुगारून इराण इस्रायलवर पलटवार करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट झाल्याचे आवाज
इराणमधील वेगवेगळ्या माध्यमांनी मंगळवारी उत्तर इराणमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट झाल्याचे आवाज आल्याचे वृत्त दिले आहे. काही वृत्तांत तर स्फोटासोबतच आकाशात एअर डिफेन्स सिस्टिमच्या काही कारवाया झाल्याचंही सांगितलं आहे.
युसुफवंद नावाच्या कमांडरचा मृत्यू
या वृत्तानंतर इराणीयन रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात आयआरजीसीने अधिकृतपणे मोहम्मद तागी युसुफवंद नावाच्या कमांडरचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे. युसुफवंद हे इराणच्या बासीज पॅरामिलिटरी फोर्सेसच्या इंन्टेलिजन्स प्रोटेक्शनचे कमांडर होते. इस्रायलने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांत आमच्या कमांडरचा मृत्यू झाला, असं आयआरजीसीने सांगितले आहे.
इस्रायलने हल्ले केल्याचं केलं मान्य
दुसरीकडे इस्रायलनेदेखील हे हल्ले केल्याचं मान्य केलं आहे. टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार आम्ही उत्तर इराणच्या काही भागात सौम्य प्रमाणात एअर स्ट्राईक केले आहेत. इराणने आमच्यावर बॅलेस्टिक मिसाईल्सने हल्ले केले होते. त्याच हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे, असे इस्रायलने सांगितले आहे.
आगामी काळात नेमकं काय होणार?
दरम्यान, आता इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध थांबले आहे. युद्धविराम झाल्याने संपूर्ण जगाने सुटकेचा निश्वास टाकला आहे. कारण या दोन्ही देशांत युद्ध भडकले आणखी भडकले असते तर त्याचा परिणाम भारतासह जगभरातील इतरही देशांवर पडला असता. त्यामुळे सध्या युद्ध थांबले आहे. पण आगामी काळात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
