युद्धबंदीनंतर इराणची मोठी कारवाई, मोसादसह इस्रायल चिंतेत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायल यांच्यात शस्त्रसंधी झाल्याची घोषणा केली आहे. मात्र युद्धबंदी होताच इराणने इस्रायलला मोठा दणका दिली आहे.

इराण आणि इस्रायल यांच्यात गेल्या 12 दिवसांपासून युद्ध सुरु होते, मात्र आता हे युद्ध थांबले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायल यांच्यात शस्त्रसंधी झाल्याची घोषणा केली आहे. मात्र युद्धबंदी होताच इराणने इस्रायलला मोठा दणका दिला आहे. यामुळे इस्रायलची चिंता वाढली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मोसादच्या 6 हेरांना अटक
युद्धबंदी झाल्यानंतर इराणने इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादला दणका दिला आहे. इराणने आपल्या देशातील मोसादच्या 6 हेरांना अटक केली आहे. या सर्वांवर सायबर स्पेसद्वारे मोसादला गुप्तचर माहिती पाठवल्याचा आरोप आहे. इराणने या हेरांना आता कायदेशीर खटल्यासाठी पाठवले आहे. या हेरांवरील आरोप सिद्ध झाल्यास इस्रायलची चिंता वाढण्याची शक्यता आहे.
मेहर न्यूजने दिलेल्या माहितीनुसार सर्व 6 हेरांना इराणच्या हमदान प्रांतातून अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून इराणची गुप्तचर संस्था या हेरांना पकडण्यासाठी प्रयत्नशील होती. मात्र युद्धबंदीनंतर या हेरांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र मोसाद किंवा इस्रायलने आतापर्यंत यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
हेरांवर देशद्रोहाचा गुन्हा
मोसादच्या 6 हेरांना अटक केल्यानंतर इराणने म्हटले की, ‘हे सर्वजण इस्रायलच्या इशाऱ्यावर काम करत होते. हे हेर मोसादला गुप्तचर माहिती देत होते. तसेच ते स्थानिक लोकांना सरकारविरुद्ध भडकावत होते.’ आता इराणने या हेरांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांवर जर देशद्रोहाचा आरोप सिद्ध झाला तर त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली जाऊ शकते.
याआधी इराणने गेल्या एका आठवड्यात मोसादसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली 20 गुप्तहेरांना अटक केली होती. तसेच 2 गुप्तहेरांना फाशी देण्यात आली होती. रविवारीही इराणने मोसादसाठी हेरगिरी करणाऱ्या एका हेराला फाशी दिली होती.
मोसादचे अनेक हेर इराणमध्ये कार्यरत
इराण इंटरनॅशनलने दिलेल्या माहितीनुसार, मोसादचे अनेक हेर इराणमध्ये कार्यरत आहेत. हे हेर ट्रक ड्रायव्हर्स म्हणून काम करत असल्याचे समोर आले आहे. तसेच हे हेर सतत इराणची गुप्तचर माहिती इस्रायलला पाठवतात. यामुळे मोसाद इराणच्या सरकारमध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करते. काही दिवसांपूर्वा इस्रायलने 15 इराणी अणुशास्त्रज्ञांची आणि 10 लष्करी अधिकाऱ्यांची हत्या केली होती. याचे नेतृत्व मोसादने केले होते अशी माहिती समोर आली आहे.
