Iran Israel War : इस्रायलच्या हल्ल्याने अख्खं चॅनल जळत होतं… पण ती डगमगली नाही, ढिगाऱ्यातून उठली अन् सुरू ठेवलं लाइव्ह
इस्रायलच्या तेहरानवरील हल्ल्यात इराणी अँकर सहर इमानीच्या धाडसीपणाची कहाणी जगभर चर्चेत आहे. इराणी राज्य प्रसारण संस्थेच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यादरम्यान लाईव्ह प्रसारणादरम्यानच तिने स्टुडिओ कोसळताना पाहिले. परंतु तिने धैर्याने पुन्हा प्रसारण सुरू ठेवले. तिच्या या धैर्याचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे आणि तिला इराणी महिलांचे प्रतिक म्हणून पाहिले जात आहे.

इराण आणि इस्रायल दरम्यान सुरू झालेलं युद्ध थांबण्याचं काही नाव घेताना दिसत नाहीये. तसंच दोन्ही देशातील युद्ध थांबवण्यासाठी कुणीही पुढे येताना दिसत नाहीये. इस्रायल आपल्या शक्तीशाली हत्याराने इराणच्या महत्त्वाच्या भागांना निशाणा बनवत आहे. सैन्य ठिकाणे असो की निवासी परिसर… प्रत्येक भागात इस्रायलने हल्ले सुरू केले आहेत. जणू काही इराणला नकाशावरून संपवायचंच आहे, अशा पद्धतीने हा हल्ला सुरू आहे. या हल्ल्याचे फोटो आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर तरी असंच वाटत आहे.
इराण-इस्रायलच्या हल्ल्याचे असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात एका टीव्ही अँकरचाही व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या टीव्ही अँकरचा लाइव्ह शो असतानाच सरकारी चॅनलवर इस्रायलने मिसाइलचा मारा केला. त्यामुळे बघता बघता चॅनल पेटलं. सर्वत्र आगीचे लोळ उठले. खांब कोसळले. पण ही मुलगी डगमगली नाही. ढिगारा हटवून ती बाहेर आली आणि तिने लाइव्ह कार्यक्रम सुरूच ठेवला. तिच्या बातमीदारीच्या निष्ठेची आणि देशप्रेमाची जगभर चर्चा होताना दिसत आहे.
कोण आहे सहर इमानी?
सहर इमानी (Sahar Emani) ही इराणी राज्य प्रसारण संघटन IRIB ची प्रमुख अँकर आहे. म्हणजे इराणच्या सरकारी चॅनलची ती प्रमुख अँकर आहे. ती फूड इंडिनियर होती. पण 2010मध्ये तिने मीडियात पाऊल टाकलं. तिने अत्यंत कमी वेळात इराणच्या सरकारी चॅनलमध्ये आपलं स्थान निर्माण करून ते बळकटही केलं. बघता बघता ती इराणमधील एक मोठं नाव म्हणून उदयास आली. सहर अरेबिक भाषेत बातम्या वाचते. डोक्यावर हिजाब घेऊन आणि कोणताही हेवी मेकअप न वापरता ती बातम्या देण्याचं काम करते. सहरचं लग्न झालेलं आहे. तिला एक मूलही आहे.
अन् स्टुडिओवर मिसाईल कोसळलं
16 जून 2025 रोजी म्हणजे काल इस्रायलच्या तेहरान येथील IRIB च्या मुख्यालयावर हवाई हल्ला करण्यात आला. त्यावेळी सहर इमानी लाइव्ह प्रसारण करत होती. हल्ल्याच्यावेळी स्टुडिओला आग लागली. धूर निघू लागला. स्टुडिओचा काही भाग कोसळल्याने समोर मातीचा प्रचंड ढिगारा पसरला. त्याही परिस्थितीत धाडस आणि आत्मविश्वासाने भरलेल्या सहरला थोडावेळ लाइव्ह प्रक्षेपण सोडून जावं लागलं. पण नंतर तिची पुढची कृती पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तिने थोड्यावेळाने पुन्हा त्याच जिद्दीने लाइव्ह प्रसारण सुरू केलं. ती डचमळली नाही, डगमगली नाही. अविचल मनाने तिने बातमीदारी सुरू ठेवली. तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती नव्हती. आता तिच्या डोळ्यात फक्त चमक होती.
View this post on Instagram
सोशल मीडियावर लोकप्रिय
इस्रायली हल्ल्यानंतर लगेचच तिने बातमी देणं सुरू केल्याने तिचं सोशल मीडियातून प्रचंड कौतुक होत आहे. इराणच्या उपराष्ट्रपती ज़हरा बहरामज़ादेह आज़र यांनी एक्सवर पोस्ट करत सहरचं प्रचंड कौतुक केलं आहे. सहर म्हणजे महिलांच्या शौर्याचं प्रतिक आहे. तिची आक्रमकता आज इराणच्या नागरिकांचा आवाज बनली आहे, असं उपराष्ट्रपतीने म्हटलं आहे. तर बोट दाखवून बोलणं हा सहरचा ट्रेडमार्क आहे. त्याची तुलना आता ईराणी नेत्यांशी होत आहे.
