इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलची आणखी घातक हल्ल्याची तयारी, थेट तेल…
इस्रायल आणि इराण यांच्यात आता पुन्हा एकदा युद्ध सुरु होण्याची शक्यता आहे. एकीकडे इस्रायलकडून लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य केले जात असताना आता इस्रायलवर इराणने क्षेपणास्त्रे डागली आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. इस्रायलकडून कोणत्याही क्षणी इराणवर हल्ल्याची शक्यता आहे.
इराणकडून झालेल्या हल्ल्यानंतर आता इस्रायलने संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांना इस्रायलमध्ये येण्यास बंदी घातली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी इराणच्या हल्ल्याचा निषेध केला नाही, त्यामुळे त्यांनी हा निर्णय़ घेतला आहे. मंगळवारी रात्री इराणने इस्रायलवर 180 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली. इस्त्रायली संरक्षण दलाने (आयडीएफ) सांगितले की हा हल्ला मोसाद मुख्यालय, नेवाटीम एअर बेस आणि टेल नोफ एअर बेसला लक्ष्य करण्यासाठी करण्यात आला होता. पण इराणची बहुतेक क्षेपणास्त्रे इस्रायलच्या संरक्षण यंत्रणेने नष्ट केली. आयडीएफच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यात कोणीही गंभीर जखमी झालेले नाही.
लेबनॉनमध्ये इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात अजूनही संघर्ष सुरू आहे. बुधवारी, लेबनॉनमध्ये ग्राउंड ऑपरेशन सुरू झाल्यानंतर प्रथमच, हिजबुल्लाहच्या सैनिकांची इस्त्रायली सैन्याशी चकमक झाली. अल जझीराच्या बातमीनुसार, यामध्ये 2 सैनिकांचा मृत्यू झाला असून 18 जखमी झाले आहेत. लेबनॉनच्या ओडेसा गावात ही चकमक झाली.
इस्त्रायली लष्करानेही आपली दुसरी तुकडी लेबनॉनला पाठवण्याची घोषणा केली. त्यामुळे इस्रायलने लेबनॉनमधील 25 गावांमध्ये राहणाऱ्या लोकांना हा परिसर रिकामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने आता आणखी घातक हल्ल्याची तयारी केली आहे. इराणने अत्याधुनिक शस्त्रे आणि क्षेपणास्त्रे वापरल्याचा दावा न्यूयॉर्क टाइम्सने केला आहे.
इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने इस्रायलकडून हल्ला झाल्यास त्याला उत्तर देण्यासाठी क्षेपणास्त्रे तैनात केल्याचा दावा केला आहे. कोणताही धोका असल्यास ते हल्ला करण्यास तयार असल्याचं त्यांनी म्हटले आहे. इस्रायलने इराणमध्ये पाहुणे म्हणून आलेल्या हमासचे प्रमुख यांना ठार केले होते. इराणमध्ये असताना त्यांची हत्या झाल्याने इराणने याचा बदला घेण्याची शपथ घेतली होती.
येमेनच्या हुथी बंडखोरांनी दावा केला आहे की त्यांनी इस्रायलमधील अनेक लष्करी चौक्यांना लक्ष्य केले आहे. या हल्ल्यासाठी त्यांनी कुड्स 5 रॉकेटचा वापर केला. हुथी गटाचे प्रवक्ते याह्या सारी यांनी सांगितले की, जोपर्यंत इस्रायल लेबनॉन आणि गाझामधील हल्ले थांबवत नाही तोपर्यंत आम्ही इस्रायली सैन्याविरोधातील कारवाया करताना मागेपुढे पाहणार नाही. मात्र, इस्रायलने कोणत्याही रॉकेट हल्ल्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
इस्रायलने जर इराणमधील तेल साठ्यांना लक्ष्य केले तर याचा भारतासह अनेक देशांना फटका बसू शकतो. कारण भारतासह अनेक देश हे इराणमधून तेल आयात करत असतात. त्यामुळे जर इस्रायलने तेल साठ्यांना लक्ष्य केले तर तेलाच्या किंमती वाढू शकतात. जगात तेलाची कमतरता भासू शकते.