शेतात 100 फुटांचे अजस्त्र खड्डे! शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीती, कोण गिळतंय त्यांची जमीन?
Mysterious 100 Foot Holes in Farmers Fields: शेतकरी सध्या दहशतीत आहेत. कारण त्यांच्या शेतात अजस्त्र खड्डे पडले आहेत. त्यातील काही 100 फुट रुंद तर शेकडो फुट खोल आहे. हे खड्डे जणू त्यांची शेतीच गिळंकृत करत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Turkey Sinkhole Farmers Panic News: तुर्की या देशात एक नवीनच संकट उभं ठाकलं आहे. कारण येथे जमिनीत अजस्त्र खड्डे तयार होत आहेत. हे खड्डे जागीच ढासळत असल्याने जमिनीत खड्ड्यांची रुंदी वाढत आहे. जमीन खाली खाली जात असल्याने चिंता वाढली आहे. या खड्ड्यांचा आकार वाढत आहे. तर त्याची खोली सुद्धा अनेक फुट आहे. या अजस्त्र खड्यांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने सरकारने संशोधन पथकाला पाचरण केलं आहे. आतापर्यंत 100 फुट रुंदीचे जवळपास 684 सिन्कहोल सापडल्याची नोंद झाली आहे. हा आकडा भयावह असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
संशोधन पथकाला केले पाचरण
कोन्या तंत्रज्ञान विद्यापीठाचे पथक या भागात दाखल झाले आहे. या तज्ज्ञांचे मते हा प्रकार अधिक वाढला आहे. पण याची सुरुवात 2000 वर्षांपासून झाली आहे. ड्रोनद्वारे एका गव्हाच्या शेताचा फोटो काढण्यात आला. त्यात अनेक ठिकाणी छोटे आणि मोठाले खड्डे दिसत आहेत. या पथकाने केलेल्या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानुसार, गेल्या एका वर्षातच करापिनार जिल्ह्यात 20 हून अधिक मोठे ढासळणारे अजस्त्र खड्डे तयार झाले आहेत. यामुळे शेतीपयोगी जमीन झपाट्याने कमी होत आहे. तर पशु,प्राणी आणि मनुष्य हानी होण्याचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे.
तुर्कीत का तयार होताहेत रहस्यमयी खड्डे?
तुर्कीत जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. या भागात सातत्याने आवर्षणाची स्थिती आहे. गेल्या काही वर्षात पाऊसमान कमी झाले आहेत. जमिनीत पाणी मुरणे जवळपास थांबले आहे. कोन्या भागात बीटरुट आणि मक्क्याचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा झाला. त्यामुळे या भागात पाण्याची पातळी अनेक फुट खाली गेली.
30 वर्षांपूर्वी ही समस्या इतकी भयावह नव्हती. तेव्हा एखाद्या ठिकाणी असं खड्डे दिसायचं. पण गेल्या एक दोन वर्षात या खड्ड्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. एका मागून एक खड्डे तयार होत आहेत आणि जमीन खोल खोल जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकरी एकटे शेतात जाण्यास घाबरत आहे. काही ठिकाणी तर अर्ध्याहून अधिक शेतात मोठाले खड्डे तयार झाले आहेत. या घटनाक्रमानंतर या भागात इंधन विहीर, बोअरवेल घेण्यास मज्जाव करण्यात येत आहे. तर सरकार दरबारी उपाय योजना करण्यासाठी इतर देशांचं सहकार्य घेण्याविषयी चर्चा सुरू आहे.
