किम जोंग यांच्या आदेशाने जग संकटात, उत्तर कोरियाच्या लॅबमध्ये नेमकं काय चाललंय?
उत्तर कोरियात सर्वाधिक घातक अशा शस्त्राची निर्मिती केली जात आहे. यामुळे या शस्त्रनिर्मितीचा संपूर्ण जगाने धसका घेतला आहे.

उत्तर कोरिया हा असा देश आहे, जो कधी काय करेल हे सांगता येत नाही. या देशाचे प्रमुख किम जोंग ऊन यांनी याआधी संपूर्ण जगाला धडकी भरवणारे मोठे निर्णय घेतलेले आहे. त्यांचा राज्यकारभारही असाच सर्वांना अचंबित करणार आहे. असे असतानाच आता याच उत्तर कोरियातून एक मोठी माहिती समोर येत आहे. हा देश संपूर्ण जगावर संकट निर्माण होईल, अशा शस्त्राची निर्मिती करत आहे.
रासायनिक शस्त्रांची केली जातेय निर्मिती
मिळालेल्या माहितीनुसार हे शस्त्र बनवण्याचा आदेश खुद्द किम जोंग ऊन यांनीच दिलाय. त्यामुळे आता संपूर्ण जगाचे लक्ष या देशाकडे लागले आहे. याआधी उत्तर कोरियाने अणूबॉम्ब तयार करण्याचे काम चालू केलेले आहे. त्यानंतर आता हा देश आणखी एका संहारक शस्त्राची निर्मिती करत आहे. उत्तर कोरियाचे हे शस्त्र रासायनिक असेल, असे सांगण्यात येत आहे.
रासायनिक शस्त्र सर्वाधिक संहारक
उत्तर कोरियाने रासायनिक शस्त्र घेऊन जाणाऱ्या बॅलेस्टिक मिसाईलचे परीक्षण याआधीच केलेले आहे. त्यानंतर आता या देशाने रासायनिक शस्त्राची निर्मिती करण्याची प्रक्रिया चालू केली आहे. या शस्त्राची निर्मिती लवकरात लवकर व्हावी यासाठी संशोधन आणि निर्मिती प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. रासायनिक शस्त्र हे सर्वाधिक संहारक मानले जाते. आजघडीला तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा झालेला विकास पाहता रासायनिक सस्त्रं ही सर्वांत घातक असल्याचे बोलले जाते. युद्धाच्या काळात आता अण्वस्त्रांसोबतच अशा प्रकारच्या शस्त्रांचाही वापर केला जाण्याची शक्यता बळावली आहे. उत्तर कोरियाच्या याच रासायनिक शस्त्रनिर्मितीच्या प्रक्रियेवर तेथील डेली एनके या वृत्तपत्रात एक रिपोर्ट आला आहे. या रिपोर्टमध्ये उत्तर कोरियाच्या या महत्त्वाकांक्षेबाबत सविस्तरपणे सांगण्यात आले आहे.
पहिला हल्ला दक्षिण कोरियावर?
उत्तर कोरिया आणि या देशाचे शेजारील राष्ट्र दक्षिण कोरिया यांच्यात 1950 सालापासून तणाव आहे. त्यामुळे उत्तर कोरिया रासायनिक शस्त्राचा वापर अगोदर दक्षिण कोरियावरच करण्याची दाट शक्यता आहे. उत्तर कोरियाकडे साधारण 2500 ते 5000 टन रासायनिक शस्त्रांचे भांडार आहे. यामध्ये सायनाईड, फॉस्जीन, सरीन, व्हिएक्स अशा रसायनांचा समावेश आहे.
1 लाख 25 हजार लोकांचा मृत्यू होऊ शकतो
दरम्यान, अमेरिकेतील रेड कॉर्पोरेशनने 2022 सालीच उत्तर कोरियाच्या या रासायनिक शस्त्रनिर्मितीच्या मोहिमेवर चिंता व्यक्त केली होती. एक हजार सरीनच्या माध्यमातून साधारण 1 लाख 25 हजार लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असे रेड कॉर्पोरेशनच्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
