Shahbaz sharif : आता अक्कल सुचली, शांततेसाठी चर्चा करण्यास तयार; शाहबाज शरीफ यांचं विधान चर्चेत
भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षानंतर, आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे शांतता चर्चेबद्दल बोलले आहे. पहलगामचा दहशतवादी हल्ला, त्यानंतर भारताने केलेली कारवाई आणि पाकचे पुन्हा नापाक हल्ले यानंतर दोन्ही देशातील तणाव वाढल्यानंतर आता शहबाज शरीफ यांनी केलेल्या या विधानाची चर्चा रंगली आहे.

पहलगामचा दहशतवादी हल्ला, त्यानंतर भारताने बदला घेत केलेलं ऑपरेशन सिंदूर यात अनेक दहशतवादी ठार झाले. मात्र त्यानंतर खवळलेल्या पाकने पुन्हा आगळीक करत भारतवार डोर्न-मिसाईल हल्ले करण्याचा प्रयत्न केला पण भारताच्या मजबूत एअर डिफेन्सने ते सर्व हल्ले परतवून लावले. गेल्या 20 दिवसांपेक्षा अधिक काळापासून भारत-पाक तणाव वाढला असून काही दिवसांपासून संघर्षही वाढला होता. चार दिवसांच्या संघर्षानंतर अखेर दोन्ही देशांनी सीजफायरची घोषणा केली. आता दोन्ही देशांतील तणावांदरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शांततेबाबत मोठे विधान केले आहे.आपण भारतासोबत शांतता चर्चा करण्यास तयार असल्याचे मोठे विधान शहबाज शरीफ यांनी केलं आहे. काश्मीर वाद आणि पाणी वाटप यांसह द्विपक्षीय मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी भारताला व्यापक चर्चेसाठी त्यांनी आमंत्रित केलं आहे. पण जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी आणि दहशतवादी अड्डे नष्ट करत नाही तोपर्यंत चर्चेचा प्रश्नचं नसल्याचे भारताने ठणकावून सांगितलं आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी गुरुवारी भारताला चर्चेचा प्रस्ताव दिला. आपला देश “शांततेसाठी” वाटाघाटी करण्यास तयार असल्याचे ते यावेळी म्हणाले. पंजाब प्रांतातील कामरा हवाई तळाला भेट देताना शाहबाज यांनी हे विधान केलं. तेथे त्यांनी भारतासोबत झालेल्या अलिकडच्या लष्करी संघर्षात सहभागी असलेल्या अधिकारी आणि सैनिकांशी संवाद साधला.
काय म्हणाले पाकचे पंतप्रधान ?
आम्ही त्यांच्याशी (भारताशी) शांततेसाठी चर्चा करण्यास तयार आहोत, असे शाहबाज शरीफ म्हणाले. ‘शांततेच्या अटींमध्ये’ काश्मीर मुद्दा देखील समाविष्ट आहे, असेही त्यांनी नमूद केलं. जम्मू आणि काश्मीरचा केंद्रशासित प्रदेश आणि लडाखचा केंद्रशासित प्रदेश ‘हे नेहमीच आपला अभिन्न आणि अविभाज्य भाग राहतील, असे भारताने वेळोवेळी स्पष्ट केलं आहे. शाहबाज शरीफ यांच्यासोबत उपपंतप्रधान इशाक दार, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ, लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल झहीर अहमद बाबर सिद्धू हे देखील एअरबेसवर उपस्थित होते.
पहलगाम हल्ल्यानंतर वाढला तणाव
गेल्या महिन्यात, 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांना त्यांचा धर्म विचारत, गोळ्या घालून ठार मारले. या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता.त्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक मोठ्या कारवाया केल्या. सिंधू जल करार स्थिगत करणे, आणि पाकिस्तानशी असलेले सर्व राजनैतिक संबंध संपुष्टात आणणे हे त्यातील महत्वाचे पाऊल होते. त्यासोहत, भारतात उपस्थित असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून परत जाण्यास सांगण्यात आले.
ऑपरेशन सिंदूरद्वारे घेतला बदला
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने 6-7 मेच्या रात्री पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक करत 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यामध्ये 100 हून यअधिक दहशतवादी मारले गेले. भारताच्या या कारवाईनंतरच चवताललेल्या पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले. भारताने पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला हाणून पाडला आणि प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानचे अनेक हवाई तळ आणि इतर ठिकाणे उद्ध्वस्त केली.
पंतप्रधान मोदींनी दिला कडक इशारा
हवाई हल्ला आणि सीझफायरनंतर पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केले. पाकिस्तान जेव्हा त्यांच्या देशातील सर्व दहशतवादी संरचना आणि त्यांच्याशी असलेले संबंध संपवण्यास तयार असेल तेव्हाच पाकिस्तानशी चर्चा केली जाईल, असे पंतप्रधानांनी तेव्हा स्पष्ट केलं होतं. त्याशिवाय पाकिस्तानशी कोणत्याही मुद्यावर चर्चा होणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितलं.
