आता थेट राजधानीवर हल्ला करणार, तालिबानची आक्रमक भूमिका, पाकिस्तान चिंतेत
PAK vs AFG War: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर युद्ध पहायला मिळाले होते. दोन्ही बाजूंनी झालेल्या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा एकदा या दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. अफगाणिस्तानने आता आक्रमक भूमिका जाहीर केली आहे.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर युद्ध पहायला मिळाले होते. दोन्ही बाजूंनी झालेल्या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा एकदा या दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. अफगाणिस्तानने आता आक्रमक भूमिका जाहीर केली आहे. अफगाणिस्तानच्या सुत्रांनी स्थानिक माध्यमांना याबाबत माहिती दिली आहे. आगामी काळात पाकिस्तानने हल्ला केल्यास तालिबानकडून चोख प्रत्युत्तर दिले जाईल. जर पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोट केले तर थेट राजधानी इस्लामाबादवर हल्ला करण्याची तयारी तालिबानकडून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पाकिस्तानकडून सकारात्मक चर्चा नाही
अफगाणी सुत्रांनी सांगितले की, तालिबान चर्चेसाठी तयार होता, मात्र पाकिस्तानी शिष्टमंडळाने सहकार्य केले नाही. काही पाकिस्तानी प्रतिनिधींनी इस्तंबूलमधील मीटिंगमध्ये जाणूनबुजून तोडफोड केली. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये योग्य चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे आता अफगाणिस्तानकडून या सर्व प्रकरणाला युद्ध म्हणून पाहिले जात आहे. याच कारणामुळे आता अफगाणिस्तानने इस्लामाबादवर हल्ल्याची तयारी सुरु केली आहे.
दोन्ही देशांमधील तणाव वाढला
पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हद्दीत शिरून एअर स्ट्राइक केला होता. यात काही तालिबानी सैनिकांसह नागरिकांचाही मृत्यू झाला होता. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. या महिन्याच्या सुरुवातीला दोन्ही देशांमध्ये झालेल्या संघर्षात अनेक सैनिक, नागरिक आणि दहशतवादी मृत्युमुखी पडले होते. तालिबानने पाकिस्तानचे काही सैनिकही ओलीस ठेवले होते. मात्र 19 ऑक्टोबर रोजी कतार आणि तुर्कीच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चेनंतर हा संघर्ष तात्पुरता थांबला होता. मात्र काही काळानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी आगामी काळात दोन्ही देशांमधील चर्चा अयशस्वी झाली तर दोन्ही देशांमध्ये युद्ध होऊ शकते असे विधान केले होते. त्यांमुळे दोन्ही देशांमधील तणाव कायम आहे.
पाकिस्तान-अफगाणिस्तान संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांचे भाष्य
मलेशियातील आसियान शिखर परिषदेत बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी या दोन्ही देशांमधील संघर्षावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, मला असं समजलं आहे की पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, ते हा प्रश्न लवकर सोडवतील. दरम्यान, पाकिस्तानने अनेकदा आरोप केला आहे की, तालिबान दहशतवाद्यांना अफगाणिस्तानची भूमी वापरण्याची परवानगी देते, त्यामुळे ते पाकिस्तानवर हल्ला करतात, मात्र हा आरोप तालिबानने नाकारला आहे.
