इम्रान खान यांच्या घरात लाहौर पोलीस, थेट बुलडोझरची कारवाई, पाकिस्तानात खळबळ

मंजिरी धर्माधिकारी, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 18, 2023 | 3:33 PM

तोशाखाना प्रकरणामुळे इम्रान खान यांच्या अडचणी वाढतच आहेत. पंतप्रधानपदावर असताना इम्रान खान यांच्यावर भेटवस्तूंमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.

इम्रान खान यांच्या घरात लाहौर पोलीस, थेट बुलडोझरची कारवाई, पाकिस्तानात खळबळ
Image Credit source: tv9 marathi

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या तोशाखाना प्रकरणातील अडचणी अधिकच वाढल्या आहेत. तोशाखाना प्रकरणी इम्रान खान यांना आज इस्लामाबाद (Islamabad) कोर्टात हजर होण्यास सांगण्यात आलं आहे. एकिकडे इम्रान खान इस्लामाबाद कोर्टाकडे रवाना झाले तर दुसरीकडे त्यांच्या लाहौर येथील घरी पाकिस्तान पोलीस पोहोचली. इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इंसाफ पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात यावेळी वाद झाला. इम्रान खान यांनी इस्लामाबादच्या वाटेवर असतानाच एक व्हिडिओ शेअर केलाय. इस्लामाबादला मी पोहोचताच मला अटक करण्यात येईल, असं इम्रान खान यांनी या व्हिडिओत म्हटलंय.

बुलडोझरने गेट उघडले..

दरम्यान, तोशाखाना प्रकरणी इम्रान खान इस्लामाबाद येथे जात असतानाच त्यांच्या लाहौर येथील घरावर पोलिसांची कारवाई सुरु झाली. पाकिस्तानी माध्यमांतून हे व्हिडिओ स्पष्ट दिसत आहेत. पंजाब पोलिसांनी इम्रान खान यांच्या घराच्या गेटवर बुलडोझर चालवत कारवाई केली. यावेळी पोलीस आणि इम्रान खान समर्थकांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी २० कार्यकर्त्यांना अटक केली. तसेच कार्यकर्त्यांविरोधात पोलिसी बळाचाही वापर केला. इम्रान खान यांच्या लाहौर येथील घराजवळ अत्यंत तणावाचे वातावरण आहे. घराच्या छतावरून पोलिसांवर कुणीतरी फायरींग केल्याचंही वृत्त आहे.

बुशरा बेगम अकेली है…

इम्रान खान यांनी जारी केलेल्या व्हिडिओत ते म्हणतायत, मी इस्मालाबाद कोर्टात जातोय. त्यापूर्वीच पंजाब पोलिसांनी जमान पार्क येथईल घरावर हल्ला केलाय. तिथे बुशरा बेगम एकटीच आहे. कोणत्या कायद्यानुसार, पोलीस ही कारवाई करतायत? हा सगळा लंडन प्लॅनचा भाग आहे. असा आरोप इम्रान खान यांनी केलाय.

इम्रान खान यांच्या ताफ्याला अपघात

दरम्यान, इस्मामाबादच्या वाटेवर असताना इम्रान खान यांच्या वाहनांच्या ताफ्यालाच अपघात झाला. ताफ्यात चालणाऱ्या दोन गाड्या परस्परांवर आदळल्याने विचित्र अपघात झाला. ज्या गाड्यांचा अपघात झाला, त्यात इम्रान खान नव्हते. या अपघातात तिघे जखमी झाल्याचं वृत्त आहे.

तोशाखाना प्रकरण काय आहे?

तोशाखाना प्रकरणामुळे इम्रान खान यांच्या अडचणी वाढतच आहेत. पंतप्रधानपदावर असताना इम्रान खान यांच्यावर भेटवस्तूंमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. 2018 मध्ये देशाचे पंतप्रधान असताना इम्रान खान यांना युरोप आणि अरब देशांच्या दौऱ्यावर असताना असंख्य मौल्यवान भेटवस्तू मिळाल्या होत्या. मात्र त्यांचा हिशोब इम्रान खान यांनी दिला नसल्याचा आरोप करण्यात आलाय. तसेच यापैकी अनेक भेटवस्तू खूप कमी किंमतीत खरेदी केल्या आणि बाहेर जाऊन भरपूर किंमतीत विकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI