Russia-Pakistan : भारताशी घट्ट मैत्री असताना रशिया, पाकिस्तानला फायटर जेटसाठी इंजिन देणार असल्याच्या दाव्यावर मोठा खुलासा
Russia-Pakistan : अलीकडेच एक रिपोर्ट समोर आलेला त्यात असं म्हटलेलं की, रशिया पाकिस्तानला JF-17 थंडर ब्लॉक-III फायटर जेट्ससाठी RD-93MA इंजिनचा पुरवठा करणार आहे. आता या बद्दल रशियाने मोठा खुलासा केला आहे.

रशिया पाकिस्तानला JF-17 थंडर ब्लॉक–III फायटर जेट्ससाठी RD-93MA इंजिनचा पुरवठा करणार असल्याच वृत्त चुकीचं आहे, निराधार आहे, रशियाने ही बातमी फेटाळून लावली आहे. रशियाने अशा कुठल्याही कराराची पुष्टि केलेली नाही असं शनिवारी WION च्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. रशिया पाकिस्तानला आरडी-93एमए इंजिनचा पुरवठा करणारं नाही, असं बातमीत एका रशियन सूत्राच्या हवाल्याने म्हटलं आहे.
पाकिस्तानला इंजिन देण्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही असं रिपोर्टमध्ये रशियन सूत्राच्या हवाल्याने म्हटलं आहे. जे लोक रशिया आणि भारतात होणाऱ्या मोठ्या करारावर लक्ष ठेऊन असतात, त्यांना हा दावा तार्किक वाटत नाही. रशियाचे पाकिस्तानसोबत इतके चांगले संबंध नाहीत की, भारताने अस्वस्थ व्हावं. सूत्राने असं सुद्धा म्हटलय की, काही लोक भारत आणि रशिया संबंध खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. खासकरुन उच्चस्तरीय बैठकीआधी असे प्रयत्न केले जातात.
पाकिस्तानकडे अशी किती विमानं?
पाकिस्तानला जेएफ-17 थंडर फायटर जेटसाठी रशियाने इंजिन पुरवठ्याचा निर्णय घेतलाय असा अलीकडेच IDRW च्या रिपोर्टमध्ये मोठा दावा करण्यात आला होता. JF-17 4.5 पिढीचं फायटर विमान आहे. पाकिस्तान आणि चीनने मिळून हे विमान बनवलय. पाकिस्तानी एअर फोर्सच हे शक्तीशाली फायटर विमान आहे. पाकिस्तानकडे अशी 150 पेक्षा जास्त विमानं आहेत. या विमानांमध्ये रशियन बनावटीचं RD-93MA इंजिन आहे. यामुळेच पाकिस्तानी एअर फोर्सच्या आधुनिकीकरणात रशियाची भूमिका महत्वाची बनते. आता मात्र रशियाने इंजिन देण्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे.
ती भरपाई रशिया करेल
रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन डिसेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत, त्यावेळी हे वृत्त आलं आहे. अलीकडेच वाल्दाई सम्मेलनात पुतिन बोललेले की, मोदींसोबतच्या चर्चेत नेहमीच विश्वास आणि सहजता जाणवते. भारत रशियाकडून कच्च तेल खरेदी करतो, म्हणून अमेरिकेने भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावलं आहे. अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या सामनावर आतापर्यंत एकूण 50 टक्के टॅरिफ लावला आहे. “भारत कधी कोणाच्या दबावाखाली झुकणार नाही. मी पंतप्रधान मोदींना ओळखतो. ते सुद्धा राष्ट्र हिताविरोधात जाणारा कुठलाही निर्णय घेणार नाहीत“ असं पुतिन टॅरिफच्या विषयावर बोलले होते. ‘भारताला अमेरिकेच्या पेनल्टी टॅरिफमुळे जे नुकसान होतय, त्याची भरपाई रशियन तेल आयातीतून होईल‘ असं पुतिन म्हणाले होते.
