अणूबॉम्ब तर काहीच नाही? रशियाकडे आहे सर्वांत घातक शस्त्र; फक्त एकदा वापरलं तर…
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध चांगलेच पेटले आहे. रशियाकडे असे एक शस्त्र आहे, जे अण्वस्त्रापेक्षाही अधिक विनाश घडवून आणू शकते.

Russia Ukraine War : गेल्या कित्येक महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चालू आहे. हे दोन्ही देश माघार घेण्यास तयार नाहीत. नुकतेच रशियाने 7 जुलैच्या रात्री युक्रेनवर मोठा हल्ला केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रशियाने युक्रेनवर 100 पेक्षा अधिक ड्रोनच्या माध्यमातून हा हल्ला केला आहे. असे असतानाच आता रशिया युक्रेनला जेरीस आणण्यासाठी वेगवेगळ्या अत्याधुनिक शस्त्रांचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. रशियाचे एक शस्त्र तर अणूबॉम्बपेक्षाही घातक असल्याचे बोलले जातेय.
युक्रेनवर हल्ला चढवण्यासाठी वेगवेगळ्या शस्त्रांचा वापर
रशिया शस्त्रास्त्रांच्या बाबतीत फार पुढे निघून गेला आहे. युक्रेनवर हल्ला चढवण्यासाठी हा देश नव-नवी शस्त्रं वापरत आहे. विशेष म्हणजे रशियाच्या एका शस्त्राला तर अमेरिका तसेच पश्चिमी देशांची एअर डिफेन्स प्रणालीदेखील रोखण्यास अक्षम ठरत आहे. रशियाने 21 नोव्हेंबर 2024 रोजी या संहारक शस्त्राचा वापर केला होता. या शस्त्राला ओरेशनिक असे म्हटले जाते.
युक्रेनची मोठी शस्त्रसामग्री उद्ध्वस्त
ओरेशनिक ही रशियाकडे असलेली बॅलिस्टिक मिसाईल आहे. ही मिसाईल अत्यंत जलद गतीने शत्रूवर हल्ला करते. रशियाने नोव्हेंबरमध्ये ओरेशनिक या मिसाईलच्या माध्यमातून युक्रेनवर हल्ला केला होता. या हल्ल्यात युक्रेनची दक्षिण-पूर्व भागात असलेली मोठी शस्त्रसामग्री उद्ध्वस्त झाली होती. ओरेशनिक ही मिसाईल फार घातक आहे, असे म्हटले जाते. या मिसाईलची तुलना थेट अण्वस्त्रांशी केली जात आहे.
ओरेशनिक मिसाईल किती घातक आहे?
रशियाकडे असलेली ओरेशनिक मिसाईल ही अत्यंत जलद गतीने ठरवून दिलेल्या ठिकाणावर हल्ला करते. विशेष म्हणजे ही मिसाईल 4 हजार अंश सेल्सिअस तापमानातही तग धरून हल्ला करण्यास सक्षम आहे. एकदा हल्ला केला की ही मिसाईल एखाद्या अण्वस्त्राप्रमाणे विनाश घडवून आणू शकते. रशियाने ही मिसाईल एका वर्षाच्या आत वापरण्यास तसेच अशा मिसाईल्स आणखी तयार करण्यास सुरुवात केलेली आहे. 2025 सालाच्या शेवटपर्यंत ही मिसाईल बेलारूसमध्ये तैनात केली जाईल, असेही सांगितले जात आहे.
पुतिन यांनीच या मिसाईलबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. ओरेशनिक ही मिसाईल 4000 अंश सेल्सिअसपर्यंतच्या तापमानात तग धरू शकते. या मिसाईलची एक विशेषता आहे. नियोजित ठिकाणाच्या जवळ गेल्यावर तिचा वेग कायम राहतो. अन्य बॅलिस्टिक वारहेड मिसाईल्सचा वेग हल्ला करण्याआधी खाली येताना कमी होतो. दरम्यान, रशियाने युक्रेनवर नुकतेच ड्रोन हल्ले केले आहेत. त्यामुळे आता युक्रेन या हल्ल्यांना कशा प्रकारे उत्तर देणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
