अमेरिकेची कारवाई सुरूच, अवैध स्थलांतरितांची दुसरी तुकडी आज येणार, सर्वात जास्त नागरिक कोणत्या राज्यातील ?
डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर येथून हद्दपार होणाऱ्या भारतीयांची ही दुसरी तुकडी असेल. या महिन्याच्या सुरुवातीला 104 अवैध स्थलांतरितांची तुकडी अमृतसरला पोहोचली होती.

दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली इमिग्रेशन पॉलिसी आणखी कडक केली असून अमेरिकेत अवैधपण राहणाऱ्या नागरिकांना सक्तीने आपापल्या देशात परत पाठवलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर अवैध भारतीय स्थलांतरितांची दुसरी तुकडी आज येणार आहे. काही दिवसांपूर्वीच 104 अवैध भारतीय स्थलांतरित नागरिकांना भारतात पाठवण्यात आलं होतं. तर अवैध स्थलांतरित भारतीयांची दुसरी तुकडी आज रात्री 10 वाजता अमेरिकेतून अमृतसरला पोहोचेल.अमेरिकेहून अमृतसरला येणाऱ्या या लष्करी विमानात 119 भारतीय असतील.
रिपोर्टनुसार, अमेरिकेतून हद्दपार होणाऱ्या 119 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांमध्ये सर्वाधिक 67 लोक पंजाबमधील आहेत. तर गुजरातचे 8, उत्तर प्रदेशचे 3, गोवा, महाराष्ट्र आणि राजस्थानचे प्रत्येकी 2-2 आणि हिमाचल प्रदेश व जम्मू-कश्मीरच्या प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. हे विमान आज रात्री 10 च्या सुमारास अमृतसर एअरपोर्टवर लँड होईल.
अवैध स्थलांतरित भारतीयांची दुसरी तुकडी
डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर येथून हद्दपार होणाऱ्या भारतीयांची ही दुसरी तुकडी असेल. या महिन्याच्या सुरुवातीला 104 अवैध स्थलांतरितांची तुकडी अमृतसरला पोहोचली होती. खरंतर, ही काही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही अमेरिकेने अवैध स्थलांतरितांना हद्दपार केले आहे. यावरून संसदेत बराच गदारोळ झाला. अनिवासी भारतीयांना हातकड्या घालून बेड्या ठोकल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावर सरकारला स्पष्टीकरण द्यावे लागले. ही प्रक्रिया नवीन नाही, असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी स्वतः संसदेत सांगितले होते. यापूर्वीही असेच होत आले आहे. प्रत्येक वर्षाची आकडेवारीही त्यांनी दाखवली.
अवैध स्थलांतरित भारतीयांवर काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?
अमेरिकेत राहणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांना देश स्वीकारणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी स्पष्टपणे सांगितले होते. हा केवळ भारताचाच प्रश्न नाही. ही जागतिक समस्या आहे. जे लोक बेकायदेशीरपणे इतर देशांमध्ये राहतात त्यांना तेथे राहण्याचा कायदेशीर अधिकार नाही. अवैधरित्या राहणाऱ्या स्थलांतरितांना स्वीकारण्यास आम्ही तयार असल्याचे त्यांनी नमूद केलं.
भगवंत मान यांचा मोदी सरकारवर आरोप
मात्र, अवैध स्थलांतरित भारतीयांच्या परतण्यावरून पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केंद्रावर पंजाबची बदनामी केल्याचा आरोप केला आहे. पंजाबमध्ये स्थलांतरितांचे विमान उतरवणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटलं.