Donald Trump : जगात खळबळ! डोनाल्ड ट्रम्प यांना दक्षिण कोरियाची थेट धमकी, पुढे काय होणार?
डोनाल्ड ट्रम्प यांना दक्षिण कोरियाने निर्वाणीचा इशारा दिला आहे. या देशाने ट्रम्प यांनी आपल्या धोरणात बदल करावेत, असे सांगितले आहे. त्यामुळे आता ट्रम्प नेमकी काय भूमिका घेणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लागू केला आहे. रशियाची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांनी हा डाव खेळला होता. मात्र भारताने ट्रम्प यांना न जुमानता आपला रशियासोबतचा व्यापार चालूच ठेवला. डोनाल्ड ट्रम्प ‘अमेरिका फस्ट’ आणि ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या दोन धोरणांअंतर्गत अमेरिकेच्या हिताचे निर्णय घेताना इतर देशांना मात्र अडचणीत आणताना दिसत आहेत. अशीच स्थिती दक्षिण कोरिया या देशाचीही झाली आहे. ट्रम्प यांच्या धोरणांचा या देशाला चांगलाच फटका बसत आहे. परिणामी या देशाना आता ट्रम्प यांना एका प्रकारे धमकीच दिली आहे. त्यामुळे आता अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यातील संबंधाची जगभरात चर्चा होत आहे.
तर अमेरिकेत गुंतवणूक करताना विचार करावा लागेल
मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे म्यांग यांनी गुरुवारी (11 सप्टेंबर) अमेरिकेच्या धोरणांवर कठोर शब्दांत टीका केली. तसेच दक्षिण कोरियातील कामगारांसाठीच्या व्हिसा प्रणालीत सुधारणा न केल्यास अमेरिकेला आर्थिक फटका सहन करावा लागेल, असं सुनावलं आहे. अमेरिकेने आपल्या व्हिसा प्रणालीत सुधारणा न केल्यास आमच्या देशातील कंपन्या अमेरिकेत गुंतवणूक करताना विचार करतील, असेही मत ली जे म्यांग यांनी व्यक्त केले आहे.
दक्षिण कोरियातील कामगारांवर अटकेची कारवाई
अमेरिकेतली जॉर्जिया येथे 4 सप्टेंबर रोजी इमिग्रेशन छापेमारी झाली होती. या छापेमारीत जॉर्जिया येथे असलेल्या ह्यूंदाईच्या प्लान्टमध्ये काम करणाऱ्या 300 पेक्षा अधिक दक्षिण कोरियाई कामगारांना अटक करण्यात आली होती. विशेष म्हणजे या कमागारांना अटक केल्यानंतर त्याचे काही व्हिडीओ समोर आले होते. या व्हिडिओंमध्ये या कामगारांना बेड्या घातल्याचे दिसत होते. हे व्हिडीओ पाहून दक्षिण कोरियात संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ली जे म्यांग यांनी अमेरिकेला हा इशारा दिला आहे.
बैठकीच्या दोन आठवड्यांनंतर कारवाई
अमेरिकेत कारवाई करण्यात आलेल्या 300 कामगारांना नंतर दक्षिण कोरियाने चार्टर विमानाने स्वत:च्या देशात आणले होते. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आणि ली यांच्यात बैठक झाली होती. ही बैठक झाल्यानंतर अवघ्या दोनच आठवड्यांनी अमेरिकेत दक्षिण कोरियाच्या कामगारांविरोधात ही कारवाई करण्यात आली. ट्रम्प-ली यांच्या बैठकीनंतर अमेरिकेने दक्षिण कोरियाला अतिरिक्त टॅरिफमधून वगळले होते. मात्र जॉर्जिया येथे दक्षिण कोरियाच्या कामगारांवर कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, आता ली जे म्यांग यांनी अमेरिकेला इशारा दिल्यानंतर ट्रम्प नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
