श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती दिसानायके यांच्यामुळे भारताचा फायदा की तोटा
आर्थिक संकटात सापडलेल्य़ा श्रीलंकेत नुकताच निवडणुका पार पडल्या आहेत. निवडणूक आयोगाने मतदानाचा निकाल जाहीर केला. ज्यामध्ये ‘एकेडी नावाने प्रसिद्ध अनुरा कुमारा दिसानायके यांची श्रीलंकेच्या राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली होती. देशाची राजकीय संस्कृती बदलण्याचे वचन त्यांनी मतदारांना दिले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून लोकांच्या आशा वाढल्या आहेत.

श्रीलंकेत झालेल्या निवडणुकीत मार्क्सवादी नेते अनुरा दिसानायके यांची देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे. 2022 मध्ये श्रीलंकेच्या आर्थिक अडचणीनंतर ही पहिलीच निवडणूक होती. अनुरा यांना 42.31% मते मिळाली आहे. सजिथ प्रेमदासा यांना 32.71% आणि विद्यमान अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांना फक्त 17.27% मते मिळाली आहेत. दिसानायके यांचा पक्ष जनता विमुक्ती पेरामुना (JVP) हे भारतविरोधी भूमिका घेण्यासाठी मानले जातात. दिसानायके हे मार्क्सवादी विचारसरणीचे आहेत. त्यांमुळे त्यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली श्रीलंका चीनच्या जवळ जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दिसानायके यांचा राजकीय संघर्ष
दिसानायके यांना राजकीय जीवनात बराच संघर्ष करावा लागला. लोकांनी त्यांच्यावर आता विश्वास टाकला आहे. ५५ वर्षीय अनुरा दिसानायके यांचे सुरुवातीचे आयुष्य श्रीलंकेच्या ग्रामीण भागात अत्यंत अडचणीत गेले. ग्रामीण जीवनातून संघर्ष करत 1990 च्या दशकात त्यांनी विद्यापीठ गाठले. विद्यापीठात दिसानायके यांची राजकीय सक्रियता वाढली आणि ते जेव्हीपीमध्ये सामील झाले. JVP ने 1971 आणि 1987-89 मध्ये श्रीलंकेत सशस्त्र बंडखोरीचे नेतृत्व केले.
जेव्हीपीने लोकशाही राजकारणाकडे वाटचाल केली. दिसानायके पुढे चालत राहिले. अनुरा दिसानायके 1997 मध्ये JVP च्या समाजवादी युवा संघटनेचे राष्ट्रीय संघटक बनले आणि खासदार झाल्यानंतर 2014 मध्ये पक्षाच्या अध्यक्षपदी पोहोचले. 1971 आणि 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात जेव्हीपीने केलेली हिंसक बंडखोरी सरकारने चिरडून टाकली आणि दीर्घकाळ जेव्हीपीची प्रतिमा हिंसाचाराचीच राहिली.
मतदारांना कसे केले आकर्षित
पक्षाची प्रतिमा आधुनिक बनवण्याचे, तरुण मतदारांना पक्षाकडे आकर्षित करण्याचे आणि भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्याचे श्रेय दिसानायके यांना जाते. JVP चा फोकस सरंजामशाही आणि साम्राज्यवाद संपवण्यावर होता तर दिसानायकेचा फोकस आर्थिक मुद्द्यांवर होता. विशेषत: श्रीलंकेच्या ग्रामीण भागातील आणि कामगार वर्गाच्या गरीब स्थितीवर.
श्रीलंकेला जेव्हा गंभीर आर्थिक संकटांचा सामना करावा लागत होता, तेव्हा दिसानायके आपल्या बोलण्यातून आणि मुद्द्यांमधून लोकांपर्यंत पोहोचले. जेव्हा श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली तेव्हा प्रभावशाली राजकीय लोकांविरुद्ध रोष निर्माण झाला. अशा स्थितीत या निवडणुकीत दिसानायके यांच्याकडून लोकांना आशा दिसली.
