भारताच्या शेजारील आणखी दोन देशात तणाव, कारण काय तर…
ताजिकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संबंध तणावपूर्ण झाले आहे. ताजिकिस्तान सामूहिक सुरक्षा करार संघटनेच्या सहकार्याने अफगाणिस्तानला लागून असलेली सीमा मजबूत करत आहे. ताजिकिस्तानकडून सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

थायलंड आणि कंबोडिया या दोन आशियाई देशांमध्ये नुकताच भीषण संघर्ष झाला आहे. दोन्ही देशांची सीमा अनेक दिवस युद्धभूमी बनून राहिली. भारताचा आणखी एक शेजारी असलेल्या म्यानमारमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गृहयुद्ध सुरू आहे. या देशांमधील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारताच्या पाश्चिमात्य शेजारी देशांमध्ये आता तणाव वाढत चालला आहे. हे शेजारी देश अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तान आहेत. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही देशांच्या सीमेवर खळबळ उडाली आहे.
अफगाणिस्तानला लागून असलेल्या सीमेवर ताजिकिस्तानने वाढवलेल्या तैनातीमुळे भारताच्या पाश्चिमात्य शेजारी देशांमधील तणाव वाढला आहे. ईटीच्या वृत्तानुसार, युरेशियन कलेक्टिव्ह सिक्युरिटी ट्रीटी ऑर्गनायझेशनने (सीएसटीओ) ताजिकिस्तानमध्ये संघर्ष आणि दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी ताजिक-अफगाण सीमेवर शस्त्रे आणि सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
सीएसटीओ देशांची बैठक
ताजिकिस्तान सीएसटीओचा सदस्य आहे. या गटात ताजिकिस्तान, रशिया, कझाकस्तान, आर्मेनिया, किर्गिस्तान आणि बेलारूस यांचा समावेश आहे. मात्र, रशियाने तालिबान सरकारला मान्यता दिली असून, असे करणारा तो एकमेव देश ठरला आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत सीएसटीओच्या सदस्यांनी अफगाणिस्तानला लागून असलेल्या ताजिकिस्तानच्या सीमेवर तैनाती वाढवण्याच्या गरजेवर भर दिला.
या बैठकीत सहभागी झालेल्या देशांनी सीमा सुरक्षेसाठी शस्त्रास्त्रे, लष्करी उपकरणे आणि तांत्रिक उपकरणांची यादी तयार केली आहे. सीएसटीओचे सदस्य देश ही शस्त्रे ताजिक सीमा दलांना देतील. सीएसटीओने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ताजिक-अफगाण सीमा बळकट करण्याबद्दल त्यांची चिंता वाढली आहे.
संबंधात तणाव
2021 मध्ये अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आली. तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्यापासून ताजिकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संबंध तणावपूर्ण आहेत. त्याचा परिणाम दोन्ही देशांच्या सीमेवरही दिसून आला आहे. दोन्ही देशांमधील तणावाचे आणखी एक कारण म्हणजे ताजिक वंशाचे सुमारे 30 टक्के लोक अफगाणिस्तानात राहतात. तालिबानविरोधी नॉर्दन अलायन्सचे नेते ताजिकिस्तानमध्ये आहेत. यामुळे दोन्ही बाजूंनी अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ताजिकिस्तानव्यतिरिक्त अफगाणिस्तानातून इसिसच्या दहशतवाद्यांची इतर प्रादेशिक देशांमध्ये घुसखोरी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अफगाणिस्तानला लागून 1300 किलोमीटर लांबीची सीमा असलेल्या ताजिकिस्तानने सीमेवरील ढासळत्या सुरक्षा परिस्थितीवर आवाज उठवला आहे. मात्र, अफगाणिस्तानला शेजाऱ्यांना कोणताही धोका नसल्याचे तालिबानच्या सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, आता परिस्थिती पाहता हा तणाव वाढण्याचे संकेत मिळत आहे. आता यावर शांततापूर्ण मार्गाने काम होते की तणाव वाढतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
