Victoria Basu Case : एका महिलेमुळे भारत-रशिया भिडले, दोन्ही देशांच टेन्शन वाढलं, नेमकं काय होणार?
एका रशियन महिलेमुळे भारत आणि रशिया यांच्यातील संबंध बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणी चिंता व्यक्त केली आहे.

Victoria Basu Case : भारत आणि रशिया यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून दृढ मैत्री आहे. संरक्षण, व्यापार क्षेत्रापर्यंत या मैत्रीचा विस्तार झालेला आहे. सध्या मात्र एका महिलेमुळे या दोन्ही देशांत वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या महिलेचे नाव व्हिक्टोरिया बसू असे असून याच महिलेमुळे रशिया-भारत यांच्यात तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही महिला आपल्या चार वर्षांच्या मुलाला घेऊन भारतातून नेपाळमार्गे रशियात गेली होती.
रशियन दूतावासाने स्पष्ट केली भूमिका
व्हिक्टोरिया बसू या महिलेने भारत देश हे प्रकरण अचानकपणे चांगलेच संवेदनशील झाले आहे. सर्वोच्च न्यायालायाने या प्रकरणामुळे भारत-रशिया या दोन्ही देशांच्या संबंधावर परिणाम पडू शकतो, अशा शब्दांत चिंता व्यक्त केली आहे. या वर्षाच्या डिसेंबर महिन्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा हा दौरा जवळ आलेला असतानाच आता व्हिक्टोरिया बसू हे प्रकरण समोर आले असून तो संवेदनशील विषय बनला आहे. या प्रकरणावर आता भारतातील रशियन दूतावासाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या माध्यमात जे काही चालू आहे ते सत्यापासून खूप दूर असून फक्त तर्कावर आधारलेले आहे. आम्ही भारतीय कायद्याअंतर्गत आमच्या नागरिकांचे रक्षण कसे करता येईल, हे पाहात आहोत. आम्ही या प्रकरणात भारतीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत, असे रशियन दूतावासाने स्पष्ट केले आहे.
नेमके प्रकरण काय आहे?
व्हिक्टोरिया बसू या मूळच्या रशियन नागरिक आहेत. त्या 2019 साली भारतात आल्या होत्या. त्यांचे सायकत बसू या भारतीय नागरिकाशळी लग्न झाले होते. लग्नानंतर काही काळ लोटला. कालांतराने त्यांच्यात मतभेद निर्माण झाले आहे. त्यांच्या मुलाच्या देखभालीचा मुद्दा थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी चालू असतानाच अचानकपणे व्हिक्टोरिया बसू या भारत देश सोडून नेपाळमार्गे रशियात निघून गेल्या. या प्रकरणावर सुनावणी घेता यावी म्हणून सर्वोच्च न्यायालयाने व्हिक्टोरिया बसू यांच्या व्हिसाची मुदतही वाढवून दिली होती. मात्र त्यांनी अचानकपणे भारत देश सोडला. विशेष म्हणजे त्या आपल्यासोबत चार वर्षाच्या मुलालाही घेऊन गेल्या. त्यामुळेच या प्रकरणातील सुनावणीबाबत मोठा कायदेशीर पेच निर्माण झाला.
सर्वोच्च न्यायालयाचे नेमके मत काय?
या प्रकरणी सुनावणी घेताना शुक्रवारी (31 ऑक्टोबर) न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांनी भारत आणि रशिया या दोन्ही देशांच्या संबंधावर परिणाम पडेल असा कोणताही आदेश आम्हाला द्यायचा नाही. मात्र हे एका छोट्या मुलाचे प्रकरण असल्याने त्याकडे दुर्लक्षही करता येणार नाही, असे मत व्यक्त केले. तेच रशियन दूतावासाकडून कोणतीही ठोस मदत का मिळत नाहीये, असा सवालही सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे नेमके काय होणार? याकडे रशिया आणि भारतातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
