India Russia Oil Deal : आम्ही तुमच्याकडून तेल खरेदी करतोय, पण… एस जयशंकर यांची रशियाकडे मोठी मागणी
India Russia Oil Deal : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर रशिया दौऱ्यावर आहेत. भारत रशियाकडून तेल खरेदी करतोय, म्हणून सध्या अमेरिकेच्या रोषाला सामोर जावं लागतय. भारताच आर्थिक नुकसान होतय. या पार्श्वभूमीवर जयशंकर यांनी एका महत्वाच्या मुद्याकडे रशियाच लक्ष वेधलय. तात्काळ उपायोजना करण्याची मागणी केली आहे.

भारत आणि रशियामध्ये आधीपासूनच चांगली मैत्री आहे. पण सध्याच्या परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे भारत आणि रशिया अधिक जवळ आले आहेत. भारत-रशिया आणि चीन अशी एक नवी आघाडी उभी राहत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून अमेरिकेत आयात होणाऱ्या सामनावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. यामुळे भारतीय साहित्याची अमेरिकेत मागणी घटणार आहे. परिणामी भारताला डॉलरमध्ये मिळणारे उत्पन्न घटणार आहे. भारतात नोकरी, उद्योगांवर त्याचा विपरित परिणाम होईल. अमेरिकन टॅरिफमुळे व्यापारात जे नुकसान होईल, ते अन्य मार्गाने कसं भरुन काढता येईल याचा विचार भारतीय राज्यकर्त्यांकडून सुरु आहे.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या रशिया दौऱ्यावर आहेत. त्यांनी रशियासोबत व्यापार विस्तार करण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत तसच रशियाकडून तेल आयात वाढवल्यामुळे 58.9 अब्ज डॉलर्सची व्यापारी तूट वाढली आहे, त्याकडे लक्ष वेधले. या व्यापारी असंतुलनावर तात्काळ तोडगा शोधला पाहिजे यावर एस. जयशंकर यांचा भर आहे. जयशंकर आज त्यांचे समकक्ष परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांची भेट घेणार आहेत.
भारत-रशिया व्यापारात तूट नऊपट
“मागच्या चार वर्षात दोन्ही देशामधला द्विपक्षीय व्यापार पाचपट वाढला आहे. 2021 मध्ये 13 अब्ज डॉलर असलेला व्यापार आता 2024-25 मध्ये 68 बिलियन अमेरिकी डॉलर झाला आहे. सतत हा व्यापार वाढतोय. पण त्यासोबतच एक मोठं व्यापारिक असंतुलन सुद्धा आहे. 6.6 अब्ज अमेरिकी डॉलरवरुन हे असंतुलन वाढून 58.9 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचलं आहे. ही व्यापारी तूट नऊपट आहे. त्यामुळे आपल्याला याकडे तात्काळ लक्ष देण्याची आवश्यकता आहे” असं एस जयशंकर म्हणाले.
आज जयशंकर कोणाला भेटणार?
एस. जयशंकर आज सर्गेई लावरोव यांची भेट घेतील. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर चर्चा होईल. रशिया-युक्रेन युद्धावर सुद्धा चर्चा होईल. अलास्कामध्ये पुतिन-ट्रम्प यांची भेट झाली, त्याबद्दल सुद्धा सर्गेई लावरोव जयशंकर यांना माहिती देऊ शकतात. वाहतूक, शेती, ऊर्जा आणि वैज्ञानिक क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न असेल असं रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब तर्क
भारत रशियाकडून तेल खरेदी करतो. त्यामुळे युक्रेन युद्धासाठी रशियाला आर्थिक ताकद मिळते असं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे. चीन सुद्धा रशियाकडून भारतापेक्षा जास्त तेल खरेदी करतो याकडे ट्रम्प मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करतात. भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी म्हणून अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे.
