ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे HIV चा विळखा वाढला, जर तसं झालं तर भविष्यात…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पाठचा पुढचा कोणताही विचार न करता धडाधड निर्णय घेत सुटलं आहे. त्यामुळे आता जागतिक पातळीवर त्याचे परिणाम दिसण्याची शक्यता आहे. असं असताना अमेरिकेच्या एका निर्णयामुळे पूर्व अफ्रिकेत एचआयव्ही बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं डोकं फिरलं आहे का? असं विचारण्याची वेळ आली आहे. अमेरिका ही जागतिक महासत्ता म्हणून ओळखली जाते. मात्र ट्रम्प सरकार सत्तेत आल्यापासून अमेरिकेने नीतिधर्म सोडून दिल्याचं दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्व अफ्रिकेच्या आरोग्य मदतीत घट करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लाखो लोकांचा जीव संकटात सापडला आहे. आवश्यक औषध मिळत नसल्याने अनेक माता आपल्या मुलांना एचआयव्हीतून वाचवण्यात असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे एचआयव्ही संक्रमण वेगाने होत असून काही मातांनी नाइलाजास्तव गर्भपात करण्याचा निर्णय घेतला आहे, असा खुलासा फिजिशियन फॉर ह्यूमन राइट्सच्या रिपोर्टमध्ये समोर आला आहे. टांझानिया आणि युगांडातील डॉक्टर, परिचारिका, रुग्ण आणि तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेच्या आधारे अहवाल सांगतो की, अमेरिकन कार्यक्रम Pepfar बंद केल्याने लोकांचे जीवन धोक्यात आले आहे.
रिपोर्टनुसार, 39 लोकांशी चर्चा करण्यात आली. त्यात हा गंभीर विषय अधोरेखित झाला आहे. त्यांनी सांगितलं की, औषधांची उणीव असल्याने रुग्णांमध्ये एचआयव्ही संक्रमण वेगाने होत आहे. अनेक मातांना औषधं मिळत नाहीत अशी स्थिती आहे. त्यामुळे नवजात बालकांना एचआयव्हीची लागण होत आहे. काही दवाखाने बंद असल्याने रुग्णांना औषधांवर पाणी सोडावं लागलं आहे. त्यामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. एप्रिलमध्ये एका क्लिनिकने असेही नोंदवले की, एचआयव्हीने ग्रस्त असलेल्या प्रत्येक चार गर्भवती महिलांपैकी एका महिलेला एचआयव्ही पॉझिटिव्ह बाळ होत आहे.
पूर्व अफ्रिकेतील या स्थितीमुळे लोकांचा विश्वास आता सरकार, विदेशी मदत आणि एचआयव्ही औषधांवरून उडत चालला आहे. त्यात अफवाचं पेव उठलं असून महिला मूल एचआयव्ही पॉझिटीव्ह होऊ नये यासाठी गर्भपात करत आहेत. त्यामुळे ही स्थिती भविष्यात आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकेचा मदत कमी करण्याचा निर्णय खूपच महागात पडू शकतो. त्यातच अमेरिकेवरील विश्वास देखील उडू शकतो.
अमेरिकेने Pepfar हा जागतिक आरोग्य कार्यक्रम 2003 मध्ये सुरु केला होता. या आरोग्य चळवळीतून अफ्रिकेसह अनेक देशांमध्ये लाखो लोकांचे जीव वाचवले. 2025 या वर्षासाठी 6 अब्ज डॉलर्स हा निधी मंजूर करण्यात आला होता. पण यापैकी निम्म्याहून अधिक निधी रोखला आहे. त्यामुळे अमेरिकेची 20 वर्षांची मेहनत पाण्यात जात असल्याचं दिसत आहे.
