Russian-Ukrain War : बॉम्ब, ग्रेनेड नाही, हे युक्रेनी किडे बलाढ्य रशियन सैन्यावर पडले भारी
Russian-Ukrain War : रशिया-युक्रेन लढाईत युद्ध लढण्याच्या नवनवीन पद्धती समोर येत आहेत. ड्रोनचा वापर ही आता सामान्य बाब झाली आहे. पण त्यापुढे जाऊन आता बलाढ्य रशियन सैन्यावर बॉमब-ग्रेनेड नाही, तर किडे भारी पडले आहेत. मागच्या तीन वर्षांपासून रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. आतापर्यंत या युद्धात हजारो निष्पाप लोक मारले गेले आहेत.

मागच्या तीन वर्षांपासून सुरु असलेल्या रशिया-युक्रेन युद्धात आतापर्यंत आपण बॉम्ब, मिसाइल आणि ड्रोनने हल्ला केल्याच्या बातम्या वाचल्या आहेत. पण युद्धाच्या मैदानात पहिल्यांदाच अशी पद्धत समोर आलीय की, ज्याने सगळेच हैराण आहेत. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा दारुगोळा संपला, त्यावेळी युक्रेनी सैनिकांनी ग्रेनेडच्या जागी मधमाशांचा वापर केला. त्यांनी मधमाशा रशियन सैनिकांच्या अंगावर सोडल्या. पूर्व युक्रेनच्या पोकरोवस्क शहरात अशा प्रकारे मधमाशांचा वापर करुन हल्ला करण्यात आला. मीडिया रिपोर्ट्सनुसार अशाप्रकारे एकदम वेगळ्या पद्धतीने हल्ला करण्याचा व्हिडिओ टेलिग्रामवर व्हायरल होत आहे.
एका ओसाड जागेत दोन युक्रेनी सैनिक बॉक्समधून मधमाशा घेऊन जातना दिसतायत. सैनिक या मधमाशा घेऊन थेट बंकरच्या दिशेने जातात, जिथे रशियन सैनिक लपले आहेत. ड्रोनव्दारे हे फुटेज घेण्यात आलं आहे. त्यानंतर युक्रेनी सैनिक ते दोन्ही बॉक्स रशियन सैनिक असलेल्या बंकरमध्ये फेकतात. बॉक्स फेकून जवळच असलेल्या इमारतीच्या दिशेने हे सैनिक पळत जातात. युक्रेनी सैनिकांकडचे ग्रेनेड संपले, तेव्हा त्यांनी रशियन सैनिकांना बाहेर काढण्यासाठी मधमाशांची मदत घेतली. बंकरमध्ये असलेले रशियन सैनिक बाहेर येताना दिसत नाहीयत. मधमाशांच्या हल्ल्यात हे रशियन सैनिक मोठ्या प्रमाणात जखमी झाल्यामुळे कदाचित ते बाहेर आले नसावेत, असा अंदाज आहे.
युद्ध लढण्याची पद्धत बदलली
युक्रेन या युद्धात सतत नवनवीन रणनिती अवलंबत आहे. ड्रोन वापरामुळे युद्ध लढण्याची पद्धत बदलली आहे. 2022 साली रशियावर असलेल्या अमेरिकी प्रतिबंधामुळे त्यांच्या सैन्याला कॉम्प्युटर चिप्ससाठी फ्रीज आणि डिशवॉशर सारख्या वस्तू तोडाव्या लागल्या होत्या. आता या युद्धात मधमाशांचा वापर पहिल्यांदाच झाला आहे.
अमेरिकेच्या भूमिकेमुळे युक्रेनच्या अडचणी वाढल्या
मागच्या आठवड्यात युक्रेनचे राष्ट्रप्रमुख जेलेंस्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील चर्चा फिस्कटली होती. लाईव्ह कॅमेऱ्यासमोर दोघांच भांडण झालं होतं. व्हाईट हाऊसच्या इतिहासातील ही अशा प्रकारची पहिली घटना होती. युद्ध तात्काळ थांबवावं ही डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका आहे. पण जेलेंस्की यांच्या काही मागण्या आहेत. त्यामुळे चर्चा यशस्वी होऊ शकली नाही. अमेरिकेने यापुढे युक्रेनला युद्धात सहकार्य न करण्याची भूमिका घेतली आहे.
