War Update: मोठी बातमी! युद्ध थांबण्याऐवजी पुन्हा पेटलं, रशियाचा युक्रेनवर शक्तिशाली हल्ला, अनेकांचा मृत्यू
आज (28 ऑगस्ट) रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने शक्तिशाली हल्ला केला. या हल्ल्यात 4 मुलांसह 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता हे युद्ध थांबण्याऐवजी पेटत असल्याचे दिसत आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून जागतिक स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. मात्र आता हे युद्ध थांबायच्या ऐवजी पुन्हा पेटल्याचे दिसत आहे. आज (28 ऑगस्ट) रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने शक्तिशाली हल्ला केला. या हल्ल्यात 4 मुलांसह 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता युक्रेनही या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.
रशियाने आज केलेल्या हल्ल्यात युरोपियन युनियन मिशन आणि ब्रिटिश कौन्सिलच्या मुख्यालयासह 7 जिल्ह्यांमधील इमारतींना 600 ड्रोन आणि 31 मिसाईलने लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्या इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्याबाबत बोलताना युक्रेनियन सैन्याने सांगितले की, रशियाने सुमारे 600 ड्रोन आणि 31 मिसाईलने हल्ला होता, मात्र आमच्या हवाई संरक्षण प्रणालीने 563 ड्रोन आणि 26 क्षेपणास्त्रे पाडल्याचा दावा केला आहे.
38 नागरिक जखमी
रशियाच्या हल्ल्यामध्ये एकूण 15 जणांचा मृत्यू झाला असून 38 नागरिक जखमी झाले आहेत. या हल्ल्यांनंतर बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी एक संपूर्ण इमारत ढिगाऱ्यात रूपांतरित झाली होती. या ढिगाऱ्यातून 2 मृतदेह सापडले आहेत. युक्रेनियन अधिकाऱ्यांनी सांगितले की, रशियाने केलेल्या या हल्ल्यात 38 नागरिक जखमी झाले आहेत.
एकूण 13 ठिकाणी हल्ला
या हल्ल्याची माहिती देताना युक्रेनियन सैन्याने म्हटले की, ‘रशियाने एकूण 13 ठिकाणी हल्ला केला. या हल्ल्यात ऊर्जा सुविधांचेही नुकसान झाले आहे. या रशियन हल्ल्याबाबत बोलताना युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी ‘X’ वर पोस्ट करत म्हटले की, ‘रशिया युद्ध संपवण्याबाबत वाटाघाटी करण्यासाठी टेबलावर बसण्याऐवजी क्षेपणास्त्रांची निवड करत आहे. रशियाला युद्ध संपवण्याऐवजी लोकांची हत्या करण्यात रस आहे.’
रशियन संरक्षण मंत्रालयाने काय म्हटले?
युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर रशियन संरक्षण मंत्रालयाने म्हटले की, ‘आमच्या सैन्याने लष्करी औद्योगिक तळांवर आणि विमानतळांवर हल्ला केला आहे. मात्र आम्ही युक्रेनच्या नागरिकांवर हल्ला केला नाही.’ मात्र समोर आलेल्या माहितीनुसार दाट लोकवस्तीच्या भागात अनेक हल्ले झाले होते, यात बरेच लोक मारले गेले आहेत.
