युद्ध आणखी पेटणार! झेलेंस्की यांनी पुन्हा एकदा पुतिन यांचा प्रस्ताव फेटाळला, मॉस्कोत नाही तर….
रशिया आणि युक्रेन युद्धाचा संपूर्ण जगावर परिणाम झाला आहे. या युद्धात अमेरिकेने युक्रेनची बाजू घेत रशियावर दबाव टाकण्याची रणनिती आखली आहे. त्यामुळे भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावला आहे. अशा स्थितीत पुतिन यांनी दिलेला प्रस्ताव झेलेंस्कींनी नाकारल्याने हे युद्ध आणखी चिघळणार असंच दिसत आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. दोन्ही देश युद्धातून माघार घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे त्याचा परिणाम इतर देशांवर होताना दिसत आहे. रशियाकडून कोणत्याही गोष्टी आयात करू नका असा दबाव एकीकडे अमेरिका टाकत आहे. दुसरीकडे, झेलेन्स्की आणि पुतिन यांच्यात द्विपक्षीय किंवा त्रिपक्षीय बैठक व्हावी यासाठी अलास्का शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. शिखर परिषदेनंतर ट्रम्प म्हणाले की, झेलेन्स्की आणि युरोपीय देशांचे नेते वॉशिंग्टनला येतील. यानंतर पुतिन आणि झेलेन्स्की भेटू शकतात. ट्रम्प समोरासमोर चर्चेसाठी दबाव आणत आहेत. दरम्यान, रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांनी झेलेन्स्की यांना मॉस्कोत भेटण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र हा प्रस्ताव झेलेन्स्की यांनी फेटाळून लावला आहे. या उलट झेलेंस्की यांनी मॉस्को ऐवजी कीवमध्ये बैठकीची मागणी केली आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, मी दहशतवाद्यांच्या राजधानीत जाऊ शकत नाही, कारण युक्रेनला दररोज क्षेपणास्त्र हल्ल्यांचा सामना करावा लागत आहे. पुतिन बैठकीसाठी कीवला येऊ शकतात.मॉस्कोमध्ये चर्चेचा प्रस्ताव देणे हे रशियाला शांतता चर्चेत रस नसल्याचे लक्षण आहे. दरम्यान झेलेन्स्की यांनी शनिवारी एक पोस्ट करत लिहिलं होतं की, सप्टेंबरच्या पहिल्या पाच दिवसात रशियाने युक्रेनवर 1300 हून अधिक ड्रोन हल्ले केले. 900 बॉम्ब आणि विविध प्रकारच्या 50 क्षेपणास्त्रांचा मारा केला. हे हल्ले युक्रेनच्या 14 भागात झाले होते.
झेलेन्स्की यांनी पुतिनवर आरोप केला की, अमेरिकेसोबत आमच्यासोबत ते राजकीय खेळ खेळत आहेत. त्यांना प्रत्यक्षात शांतता नको. ‘मी प्रत्येक स्वरूपात बैठकीसाठी तयार आहे. स्वित्झर्लंड, तुर्की, व्हॅटिक आणि आखाती देशांसारखे अनेक देश शांतता चर्चा करण्यास तयार आहे. पण कोणी युद्धादरम्यान असा प्रस्ताव मांडला तर तो स्वीकारता येत नाही. तर तो वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न आहे.’, असं झेलेन्स्की यांनी पुढे सांगितलं.
आता प्रश्न असा आहे की डोनाल्ड ट्रम्प यांना युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध थांबवण्यात अपयश तर येत नाही ना..कारण या दोन्ही देशांच्या नेत्यांनी ट्र्म्प यांना चर्चेबाबत शब्द दिला होता. मात्र आता बैठकीऐवजी वादाची ठिणगी पडताना दिसत आहे. त्यामुळे हे युद्ध जर चर्चेने सुटलं नाही तर आणखी पेटण्याची शक्यता आहे.
