तिरंगा बनण्यापूर्वी किती डिझाईन्स तयार करण्यात आले होते? तो सर्वात आधी कुणी फडकवला होता?
आपल्या भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा, जो आपल्या देशाचा गौरव आणि अभिमानाचे प्रतीक आहे, तो आजच्या स्वरूपात येण्यापूर्वी अनेक बदलांमधून गेला आहे. स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्षाकडे वाटचाल करत असताना, या तिरंग्याचा इतिहास आणि त्याच्या निर्मितीमागील कथा जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

आपला तिरंगा हे देशाच्या गौरवाचे प्रतीक आहे. तो अभिमानाने फडफडताना पाहिल्यावर प्रत्येक भारतीयाची छाती गर्वाने भरून येते. पण हा तिरंगा आजच्या रूपात येण्याआधी, तब्बल 7 महत्त्वाच्या डिझाईन्स मधून गेला आहे. 1904 पासून 1947 पर्यंत तिरंग्यामध्ये अनेक बदल झाले, आणि त्यानंतर 1947 मध्ये आपल्याला आपला सध्याचा राष्ट्रीय ध्वज मिळाला, जो आज आपल्या देशाची शान, मान आणि अभिमान आहे.
तिरंग्याचा निर्मितीचा इतिहास:
पहिले डिझाइन (1904): सर्वात पहिला ध्वज सिस्टर निवेदिता यांनी डिझाइन केला होता.
दुसरा ध्वज (1906): हा ध्वज पारसी बागान चौक, कोलकाता येथे स्वदेशी आणि बहिष्कार आंदोलनादरम्यान पहिल्यांदा फडकवण्यात आला. यामध्ये हिरव्या पट्टीवर आठ कमळे, पिवळ्या पट्टीवर ‘वंदे मातरम्’ हिंदीमध्ये आणि लाल पट्टीवर सूर्य-चंद्र होते.
तिसरा ध्वज (1906): मॅडम भीकाजी कामा यांनी पॅरिसमध्ये आपल्या क्रांतिकारी सहकाऱ्यांसोबत हा ध्वज फडकवला. हा पहिल्या तिरंग्यासारखाच होता, पण यात सप्तर्षींच्या रूपात सात तारे दाखवले होते.
चौथा ध्वज (1917): होम रूल चळवळीदरम्यान ऍनी बेझंट आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी तिसरा ध्वज फडकवला. या झेंड्यात पाच लाल आणि चार हिरव्या आडव्या पट्ट्या होत्या, ज्यात सात तारे होते.
पाचवा ध्वज (1921): पिंगली वेंकय्या यांनी चौथा ध्वज तयार केला आणि महात्मा गांधींना दिला. या ध्वजात पांढरा, हिरवा आणि लाल रंग वापरला होता आणि चरख्याचे चिन्हही होते.
सहावा ध्वज (1931): यानंतर ठीक 10 वर्षांनी, म्हणजेच 1931 मध्ये पिंगली वेंकय्यांच्या झेंड्यात काही बदल करण्यात आले. यात फक्त लाल रंगाच्या जागी केशरी रंग वापरण्यात आला.
अंतिम डिझाइन (1947): जुलै 1947 मध्ये, भारताच्या संविधान सभेने पिंगली वेंकय्यांच्या ध्वजाला स्वतंत्र भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारले. यामध्ये चरख्याच्या ऐवजी अशोकचक्राचा समावेश करण्यात आला.
तिरंग्याचा अर्थ:
आपल्या तिरंग्यामध्ये केशरी रंग शक्ती आणि शौर्याचे प्रतीक आहे. पांढरा रंग शांती आणि सत्याचे प्रतीक आहे, तर हिरवा रंग समृद्धी आणि विकासाचे प्रतीक आहे. तिरंग्याच्या मध्यभागी असलेले अशोकचक्र 24 आऱ्यांसह, जीवन आणि गतीशीलतेचे निरंतर चक्र दर्शवते. हा तिरंगा केवळ कापडाचा तुकडा नसून, तो आपल्या देशाच्या स्वातंत्र्य, गौरव आणि एकतेचे प्रतीक आहे.
