कुणी सुनेने हलके कपडे घातल्याने केली हत्या, तर कुणी भावालाच ठोकले; औरंगजेबापेक्षाही क्रूर राजे माहीत आहेत काय?
जगभरात असे अनेक राजे झाले आहेत, ज्यांनी तख्तासाठी आपल्याच कुटुंबातील लोकांचा खून केला. औरंगजेबाचे नाव तर या बाबतीत सर्वांना माहीतच आहे. त्याने आपल्या भावांपैकी दारा शिकोह, शुजा आणि मुराद बख्श यांची आणि त्यांचे समर्थकांची हत्या केली होती. सध्या औरंगजेब चर्चेत असला तरी त्याच्याही पेक्षा अधिक क्रूर राजे होऊन गेले.

‘छावा’ चित्रपट आला आणि औरंगजेबाच्या क्रुरतेची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. बापाला तुरुंगात डांबणारा, सिंहासनासाठी भावाची अमानुष हत्या घडवणारा राजा म्हणून औरंगजेबाची इतिहासात नोंद आहे. छल कपट ही औरंगजेबाची मुख्य शस्त्रे होती. पण इतिहासात फक्त औरंगजेबच एकटा क्रूर राजा नव्हता. त्याहीपेक्षा असंख्य क्रूर राजे होऊन गेले. त्यांच्या क्रूरतेपुढे औरंगजेबाची क्रूरता काहीच नाही. अत्यंत निर्दयी राजे होते ते. अशाच काही निर्दयी राजांबाबात आपण जाणून घेणार आहोत.
सुलतान मेहमत तृतीय
तुर्कीचा सुलतान महमत तृतीयने सिंहासनावर बसताच आपल्या 19 भावांची आणि अनेक पुतण्यांची हत्या केली होती. सुलतान मेहमतने आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी हे हत्याकांड घडवून आणलं होतं. ऑटोमन साम्राज्यात भावांच्या हत्यांची परंपरा होती. आपल्या सिंहासनाला रक्ताच्या नात्याचंच आव्हान नको म्हणून भावांचा खात्मा केला जायचा.
योंगल सम्राट
चीनच्या योंगल सम्राट (Zhu Di) ने सत्ता मिळवण्यासाठी आपल्या पुतण्याला जिवंत जाळून मारले. त्याने सिंहासन हडप करण्यासाठी पुतण्याच्या समर्थकांना देखील ठार केले. त्याच्या सत्ताकाळात हजारो लोकांना यातनां देऊन मारले गेले.
काराकाला
रोमचा सम्राट काराकालाने (Caracalla) वडिलांच्या मृत्यूनंतर भाऊ गेटाची हत्या केली. भावााला सन् 211 मध्ये मारून तो एकटा सम्राट बनला. त्याने सत्ता सामायिक करण्याचा स्पष्टपणे नकार दिला आणि गेटाला ठार केलं. त्याने गेटाच्या समर्थकांची देखील हत्या केली आणि गेटाचं अस्तित्व मिटवण्यासाठी त्याचे चित्रही पुसून टाकले.
इवान चतुर्थ
16 नोव्हेंबर 1581 च्या रात्री रशियाच्या इवान चतुर्थने आपलाच मुलगा आणि वारस इवान इवानोविचला मारून टाकलं होतं. सत्ता मिळवण्यासाठी नव्हे तर प्रचंड रागातून त्याने मुलाची हत्या केली होती. खरेतर सूनेने हलके कपडे घातले म्हणून इवान चतुर्थने तिच्यावर हल्ला केला होता. त्यामुळे मुलाला वडिलांच्या या कृतीचा प्रचंड राग आला. त्याने वडिलांशा वाद घातला.
दोघांचेही कडाक्याचे भांडण झालं. त्यामुळे इवान चतुर्थ इतका भडकला की त्याने आपल्या मुलाच्या डोक्यातच राजदंड घातला. त्यामुळे रक्तबंबाळ होऊन मुलगा इवान इवानोविच खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. पेंटर इल्या रेपिनने 19व्या शतकात एक पेंटिंग तयार केली होती. त्यात इवान चतुर्थ आपल्याच मरण पावलेल्या मुलाला गळ्याशी धरून रडताना दिसत आहे.
चंगेज खान
चंगेज खानचे नाव जगातील सर्वात निर्दयी शासकांमध्ये घेतले जाते. त्याने आपल्या जावयालाही ठार केलं होतं, कारण त्याने चंगेज खानच्या विरोधात बंड केला होता. चंगेज खानने केवळ आपल्या जावयालाच मारलं नाही, तर त्याच्या जनजातीला देखील नष्ट केलं. असा दावा केला जातो की त्याने आपल्या आयुष्यात लाखो लोकांची हत्या केली होती.
